Pune : महापालिका आयुक्तपदी नवलकिशोर राम

पुणे : विद्यमान पुणे महापालिकेचे आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले हे येत्या दि. 31 मे रोजी सेवानिवृत्त होत आहेत. त्यामुळे त्यांच्या जागी पालिका आयुक्त म्हणून राज्य शासनाने नवलकिशोर राम यांच्या नियुक्तीचे आदेश काढले आहेत. राम हे यापूर्वी पंतप्रधान कार्यालय येथे कार्यरत होते.
राम यांनी यापूवी 2018 मध्ये पुणे जिल्हाधिकारी म्हणूनही काम पाहिले आहे. राम हे मूळ बिहारचे असून, 2008 च्या बॅचचे ते महाराष्ट्र संवर्गातील आयएएस अधिकारी आहेत. राम यांनी यापूर्वी नांदेड येथे सहायक जिल्हाधिकारी म्हणून काम पाहिले. त्यानंतर यवतमाळ जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, बीड आणि औरंगाबाद जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे.
त्यानंतर त्यांची 2018 मध्ये पुणे जिल्हाधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली. पुण्यामध्ये त्यांनी 2019 मध्ये लोकसभा, विधानसभा निवडणुकांची जबाबदारी सांभाळली. त्यानंतर जिल्ह्यातील पूरपरिस्थिती यशस्वीपणे हाताळली होती. 2020 मध्ये करोना संकट नियंत्रणात आणण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. 2020 मध्येच राम यांची यांची नियुक्ती पंतप्रधान कार्यालयात उपसचिव या पदावर करण्यात आली होती.
मागील पाच वर्षांपासून ते या कार्यालयाची जबाबदारी सांभाळत होते. मागील काही दिवसांपूर्वीच त्यांची प्रतिनियुक्ती संपुष्टात येऊन ते पुन्हा राज्य शासनाच्या सेवेत आले. त्यानंतर बुधवारी राज्य शासनाने त्यांची नियुक्ती पुणे महापालिका आयुक्तपदी करण्याचे आदेश जारी केले आहेत. राम हे दि. 31 मे रोजी पदभार स्वीकारणार आहेत.





