Pune Nashik Railway : पुणे-नाशिक रेल्वेचा मार्ग बदलणार? विकास क्रांती सेनेची आमदार बाबाजी काळेंकडे मोठी मागणी
Pune Nashik Railway : रेल्वे कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी मांडली ग्रामीण विकासाची बाजू; जुन्या आराखड्यामुळे उद्योग-व्यवसायांना मोठी चालना मिळणार असल्याचा दावा.

Pune Nashik Railway – पुणे-नाशिक रेल्वे मार्ग पूर्वी प्रस्तावित करण्यात आलेल्या मार्गानेच व्हावा, यासाठी शासन दरबारी ठोस पाठपुरावा करावा, अशी मागणी विकास क्रांती सेनेच्या वतीने खेड-आळंदी मतदारसंघाचे आमदार बाबाजी काळे यांच्याकडे करण्यात आली. पुणे-नाशिक रेल्वे प्रकल्पाच्या पार्श्वभूमीवर विकास क्रांती सेनेचे प्रतिनिधी तसेच पुणे-नाशिक रेल्वे कृती समितीच्या पदाधिकार्यांनी आमदार बाबाजी रामचंद्र काळे यांची भेट घेतली.
यावेळी रेल्वे मार्गाच्या आराखड्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. चर्चेदरम्यान, हा मार्ग खेड-मंचर-नारायणगाव-आळेफाटा-बोटा-अकोले-संगमनेर या पूर्वनियोजित मार्गानेच व्हावा, अशी ठाम भूमिका प्रतिनिधींनी मांडली. या मार्गामुळे ग्रामीण भागाचा सर्वांगीण विकास होऊन उद्योग-व्यवसायांना चालना मिळेल तसेच नागरिकांच्या वाहतूक सुविधेत मोठी सुधारणा होईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
या मागणीची दखल घेत आमदार बाबाजी काळे यांनी सकारात्मक भूमिका व्यक्त करत, संबंधित विभाग व राज्य शासनाकडे स्वतः पाठपुरावा करून हा प्रश्न लवकर मार्गी लावण्याचे आश्वासन दिले. या प्रसंगी जिल्हा परिषद सदस्या दीप्ती भोगाडे, संतोष फापाळे, सतीष फापाळे, स्वप्नील हुलवळे, गणेश सहाणे, राजेंद्र चौधरी, जयसिंग मांजरे, सतीश तनपुरे, योगेश काशीद, चैतन्य गायकवाड, संतोष राक्षे, राहुल मलघे आदी उपस्थित होते.





