Pune Nashik Railway: पुणे-नाशिक सरळ रेल्वेचे स्वप्न भंगणार? आंबेगाव, जुन्नर, खेडसह ५ तालुक्यांमध्ये निराशेचे वातावरण
Pune Nashik Railway: धार्मिक आणि ऐतिहासिक स्थळांना जोडणारा महत्त्वाकांक्षी प्रकल्प अनिश्चिततेच्या गर्तेत; उत्तर पुणे जिल्हा, नगर आणि नाशिकमधील ग्रामीण भागाच्या आर्थिक विकासाला धक्का.

Pune Nashik Railway – अनेक वर्षांपासून चर्चेत असलेला पुणे-नाशिक सरळ रेल्वे मार्ग आता केवळ स्वप्नच ठरणार की काय, अशी भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाबाबत निर्माण झालेल्या अनिश्चिततेमुळे पुणे, नाशिक, आंबेगाव, जुन्नर, खेड, संगमनेर आणि अकोले परिसरातील नागरिकांमध्ये निराशेचे वातावरण पसरले आहे. पुणे-नाशिक सरळ रेल्वेमार्ग हा केवळ वाहतूक प्रकल्प नसून उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडणारा महत्त्वाचा विकासदुवा मानला जात होता.
या रेल्वेमार्गामुळे प्रवासाचा वेळ मोठ्या प्रमाणात कमी होण्याबरोबरच उद्योग, व्यापार, शिक्षण, पर्यटन आणि रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होणार होत्या. विशेषतः भीमाशंकर, ओझर, लेण्याद्री, शिवनेरी, आळंदी आणि देहू यांसारख्या धार्मिक व ऐतिहासिक स्थळांपर्यंत पोहोचणे अधिक सुलभ झाले असते. त्यामुळे या भागातील पर्यटनालाही मोठी चालना मिळाली असती, असा विश्वास नागरिकांनी व्यक्त केला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या प्रकल्पाची प्रतीक्षा करणार्या नागरिकांना आता त्याच्या भवितव्याबाबत चिंता वाटू लागली आहे.
विविध सामाजिक संघटना, लोकप्रतिनिधी आणि नागरिकांकडून हा प्रकल्प पुन्हा मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करण्याची मागणी होत आहे. राज्य आणि केंद्र सरकारने एकत्रितपणे या विषयाकडे सकारात्मक दृष्टीने पाहून जनभावनांचा आदर करावा, अशी अपेक्षाही व्यक्त होत आहे. पुणे-नाशिक सरळ रेल्वेमार्गामुळे उत्तर पुणे जिल्हा, नगर आणि नाशिक जिल्ह्यांतील ग्रामीण भागाच्या आर्थिक विकासाला गती मिळाली असती.
कृषी उत्पादनांची वाहतूक, औद्योगिक गुंतवणूक आणि पर्यटन व्यवसायाला चालना मिळण्याच्या दृष्टीने हा प्रकल्प अत्यंत महत्त्वाचा मानला जात होता. मात्र प्रकल्पाबाबतची सध्याची अनिश्चितता नागरिकांच्या अपेक्षांवर पाणी फेरणारी ठरत असल्याची भावना व्यक्त केली जात आहे.
“पुणे-नाशिक सरळ रेल्वेमार्ग हा या भागाच्या विकासासाठी अत्यंत महत्त्वाचा प्रकल्प आहे. नागरिकांच्या अपेक्षा आणि भविष्यातील गरजा लक्षात घेऊन हा प्रकल्प पुन्हा मार्गी लावण्यासाठी सर्व स्तरांवर प्रयत्न होणे गरजेचे आहे.”
– शिवाजीराव आढळराव पाटील, अध्यक्ष, म्हाडा पुणे





