Pune-Nashik railway : “पुणे–नाशिक रेल्वे सरळ मार्गानेच” – आमदार सत्यजीत तांबे
पुणे–नाशिक रेल्वे सरळ मार्गाने सिन्नर–संगमनेर–अकोले या मार्गानेच झाली पाहिजे, यासाठी ९ ऑगस्ट रोजी मोठ्या प्रमाणावर जनआंदोलन करण्यात आले होते.

Pune-Nashik railway : नाशिक रेल्वे प्रकल्प सरळ मार्गानेच व्हावा, यासाठी ९ ऑगस्ट रोजी मोठे जनआंदोलन करण्यात आले होते. आता डॉ. अनिल काकोडकर समितीला देण्यात आलेली ६० दिवसांची मुदत संपत आली असून, समितीने केवळ तांत्रिक बाबींचा विचार न करता सर्वसामान्य जनतेला विश्वासात घेऊन जनसुनावणी घ्यावी आणि त्यांच्या भावना जाणून घ्याव्यात, अशी मागणी आमदार सत्यजीत तांबे यांनी केली आहे.
पुणे–नाशिक रेल्वे सरळ मार्गाने सिन्नर–संगमनेर–अकोले या मार्गानेच झाली पाहिजे, यासाठी ९ ऑगस्ट रोजी मोठ्या प्रमाणावर जनआंदोलन करण्यात आले होते. या आंदोलनात परिसरातील विविध गावांमधील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
त्यावेळी डॉ. अनिल काकोडकर समितीला मुदतवाढ देऊ नये तसेच समितीने केवळ तांत्रिक बाबींचा अभ्यास न करता जनसुनावणी घेऊन जनतेच्या भावना जाणून घ्याव्यात, अशा दोन प्रमुख मागण्या करण्यात आल्या होत्या.
या मागण्या प्रशासनाने शासनाचे प्रतिनिधी म्हणून निफाडच्या प्रांताधिकारी कार्यालयामार्फत लेखी स्वरूपात मान्य केल्या होत्या. दरम्यान, समितीला देण्यात आलेली ६० दिवसांची मुदत आता संपण्याच्या मार्गावर आहे.
समितीची एक बैठक झाल्याची माहिती समोर आली असली, तरी अद्याप सर्वसामान्य नागरिकांना विश्वासात घेऊन त्यांची मते आणि भावना जाणून घेण्यासाठी कोणतीही जनसुनावणी झालेली नाही, असे आमदार तांबे यांनी सांगितले.
तांबे पुढे म्हणाले, शासनाच्या प्रतिनिधींनी आमच्या मागण्या लेखी स्वरूपात मान्य केल्या आहेत. त्यामुळे समितीने सर्वसामान्य नागरिकांना विश्वासात घेणे आवश्यक आहे.
केवळ तांत्रिक मुद्द्यांचा अभ्यास करून अहवाल देता कामा नये. जनतेच्या भावना समजून घेऊनच समितीने आपला अहवाल द्यावा, अशी आमची ठाम भूमिका आहे.





