Pune Nashik Railway: अहिल्यानगर-कल्याण हायवे जॅम! पुणे-नाशिक रेल्वेसाठी जुन्नरमध्ये एल्गार, पाहा काय घडले

प्रभात वृत्तसेवा
उदापूर – पुणे-नाशिक रेल्वे मार्ग जुन्नर तालुक्यातूनच जावा, या मागणीसाठी जुन्नर तालुक्यातील सर्वपक्षीय नेत्यांनी आणि ग्रामस्थांनी ओतूर येथील अहिल्यानगर-कल्याण महामार्गावरील मोनिका चौकात रविवारी (दि. १४) सकाळी ११ वाजता रास्ता रोको आंदोलन केले. केंद्र सरकारने हा मार्ग रद्द करून आता शिर्डी-अहिल्यानगर मार्गे रेल्वे करण्याचा निर्णय घेतल्याने जुन्नर तालुक्यातील जनतेत तीव्र रोष निर्माण झाला आहे.
यावेळी आमदार शरद सोनवणे, माजी आमदार अतुल बेनके, बाजार समितीचे सभापती संजय काळे यांसह सर्व पक्षांचे नेते आणि मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.जुन्नर तालुक्यातून जाणाऱ्या पुणे-नाशिक रेल्वे मार्गासाठी १९९५-९६ पासून सर्व्हे करण्यात आला होता. माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी त्यांच्या कार्यकाळात सातत्याने पाठपुरावा केला होता.
सन २०१९ पासून खासदार अमोल कोल्हे यांनीही संसदेत सातत्याने आवाज उठवला. मात्र, नारायणगाव भागातून जाणारा हा प्रस्तावित रेल्वे मार्ग जीएमआरटी या जागतिक वैज्ञानिक प्रकल्पाच्या रेडिओ शांत क्षेत्रात येत असल्यामुळे आणि रेल्वे इंजिन, ओव्हर हेड इलेक्ट्रिक लाईन व सिग्नलमुळे रेडिओ लहरींमध्ये व्यत्यय निर्माण होणार असल्याने या मार्गाला मंजुरी मिळत नसल्याचे कारण देण्यात आले.
रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी हिवाळी अधिवेशनात खासदार अमोल कोल्हे यांच्या प्रश्नाला उत्तर देताना सदर प्रस्ताव रद्द करून आता शिर्डी-अहिल्यानगर या मार्गाने रेल्वे होणार असल्याचे जाहीर केले. यामुळे जुन्नर तालुक्यातील जनतेला प्रवास, शेतमाल वाहतूक, औद्योगिक विकास आणि पर्यटनासाठी मोठी संधी मिळाली असती.
ती आता हुकणार असल्याने नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे. आंदोलनाच्या वेळी ओतूर पोलीसचे सहाय्यक पोलिस निरीक्षक लहू थाटे आपल्या पथकासह बंदोबस्तासाठी उपस्थित होते.





