PUNE: नांदेड सिटी : विकसकांच्या कामांवर कर का नाही ?

पुणे – महापालिकेकडून नांदेड सिटीतील निवासी मिळकतींना कर आकारणी करण्यात आली. मात्र,त्याच वेळी विकसकाने केलेल्या व्यावसायिक मिळकतींना कर का आकारण्यात आला नाही, असा सवाल उपस्थित करत, या प्रकरणी संबंधित अधिकार्यांवर तातडीनं कारवाई करावी, अशी मागणी महापालिका आयुक्तांकडे पत्राद्वारे केली आहे.
एका बाजूला महापालिका सर्वसामान्यांना मनमानी पध्दतीने कर आकारत असताना विकसकांना का सवलत देतेय, असा सवालही उपस्थित करण्यात आला आहे. माजी विरोधीपक्ष नेते सुहास कुलकर्णी, उज्ज्वल केसकर व माजी नगरसेवक प्रशांत बधे यांनी ही मागणी केली आहे. याबाबत आयुक्तांना दिलेल्या पत्रानुसार, नांदेड सिटीमधील सर्वसामान्य सदनिकाधारकावर विकसकाच्या सहीवर जो टॅक्स लावला, तो पूर्णपणे बेकायदेशीर आहे. विकसकाने नांदेड सिटीमध्ये आजपर्यंत किती कामे केली.
त्याच्यावर अद्याप आपण कर लावला नाही. नागरिकांना कर लावण्याच्या आधी व्यावसायिकांना कर लावणे गरजेचे होते. या ठिकाणी त्यानुसार या ठिकाणी एक आयटी टॉवर (बारा मजली), एक जीम आणि स्विमिंग टॅंक, एक मॉल त्यात साडेचारशे दुकाने, दोन शाळा, दीडशे एकरात बंगलो प्लॉटिंग केले. अडीच हजार स्क्वेअर फूट ते पाच हजार स्क्वेअर फुटाचे प्लॉट आहेत. ३२ एकरामध्ये गोल्फ क्लब आहे. त्यात क्रिकेट पीच स्विमिंग टॅंक लॉंग टेनिस, अकरा एकरात इको पार्क असून एक शंभर बेडचं मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल उभ राहत आहे. त्यामुळे या मिळकतींना कर आकारणी का नाही, असा सवाल या माजी नगरसेवकांनी उपस्थित केला आहे.





