Pune Nagpur Vande Bharat Express : पुणे-नागपूर वंदे भारत एक्सप्रेस सेवेला आजपासून सुरूवात; प्रवासाचा वेळ तीन तास कमी होणार!

Pune Nagpur Vande Bharat Express : बहुप्रतिक्षित पुणे-नागपूर ही वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन आजपासून प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहे. ही रेल्वेसेवा सुरू झाल्यानंतर पुणे नागपूरचा प्रवासाचे अंतराचा कालावधी कमी होणार आहे. तसेच जलद आणि सुखकर प्रवासाचा लाभ प्रवाशांना घेता येणार आहे. ही दिलासादायक बाब म्हणावी लागेल. आज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वंदे भारत रेल्वे सेवेचे उद्घाटन नागपूर रेल्वे स्थानकावर अॅानलाइन पद्धतीने पार पडणार आहे.
याशिवाय आज देशात तीन नव्या वंदे भारत एक्सप्रेसचा शुभारंभ होणार असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अॅानलाइन पद्धतीने या सेवेचे उद्घाटन करणार आहेत. या कार्यक्रमाला नागपूर स्थानकावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी तसेच खासदार आणि मान्यवर उपस्थित राहतील. याचवेळी बंगळुरू-बेळगाव आणि श्री माता वैष्णोदेवी कटरा-अमृतसर वंदे भारत सेवांचाही शुभारंभाचा कार्यक्रम पार पडेल.
सेमी हायस्पीड वंदे भारत एक्सप्रेसमुळे काय होणार?
ही सेवा सुरू झाल्यानंतर ९०० किलोमीटरचे अंतर अवघ्या १२ तासांमध्ये पूर्ण करता येणार आहे. तसेच पुणे-नागपूर वंदे भारत एक्सप्रेसमुळे प्रवाशांचा 3 तासांचा वेळ वाचणार आहे.
‘या’ वेळेत धावणार
आज सकाळी ९ वाजून 50 मिनिटांनी वंदे भारत एक्सप्रेस नागपूर (अजनी) स्थानकातून पुण्याच्या दिशेने मार्गस्थ होईल. रात्री ९ वाजून 50 मिनिटांनी वंदे भारत एक्सप्रेस पुण्याच्या हडपसर स्थानकावर पोहोचेल. तर ही रेल्वे सेवा पुण्याहून सकाळी 6 वाजून २५ मिनिटांनी सुटून संध्याकाळी 6 वाजून २५ मिनिटांनी नागपूर अजनीला पोहोचेल.
कुठे कुठे थांबणार?
वंदे भारत एक्सप्रेस नागपूर आणि पुण्याच्या प्रवासात येणाऱ्या १० स्थानकावर थांबेल. यामध्ये वर्धा, बडनेरा, अकोला, शेगाव, भुसावळ, जळगाव, मनमाड, कोपरगाव, अहमदनगर (अहिल्यानगर), दौंड या स्थानकावर ही एक्सप्रेस थांबणार आहे. नागपूरहून सोमवारी आणि पुण्याहून गुरुवारी ही रेल्वे सेवा बंद राहील.
हेही वाचा : ‘जर भारताने ट्रम्प यांना या कामात मदत केली तर…’ ; टॅरिफ वॉरदरम्यान अमेरिकन खासदाराचे मोठे विधान





