Pune : पालिका की नगरपरिषद प्रशासकीय वाद

फुरसुंगी – पुणे महापालिका की नगरपरिषद अशा प्रशासकीय वादात भेकराईनगर परिसरातील मूलभूत समस्याही दुर्लक्षित राहत आहेत. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण म्हणजे एमजीपीच्या नवीन पाइपलाइनचे काम येथे झाले असून जुनी भेकराई, रूपीनगर, त्रिवेणी नगर, त्रिमूर्ती विहार, परमार परिसर, सहारा सोसायटी तसेच सूर्यवंशी कॉलनी या भागात एमजीपीच्या पाइपलाइन टाकण्यात आलेली नसल्याने या परिसरातील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.
भेकराईनगर परिसरात आठ-आठ दिवस पाणी येत नसल्यामुळे या भागातील नागरिकांमध्ये महापालिकेविषयी संताप आहे. भर पावसाळ्यात नागरिकांना दररोज पैसे देऊन खासगी टँकरने पाणी मागवावे लागत आहे. यासदंर्भात महापालिकेच्या पाणीपुरवठा अधिकाऱ्यांकडे तसेच नगरपरिषदेच्या अधिकाऱ्यांकडेही अनेकदा पत्रव्यवहार करूनही याची कोणतीच दखल घेण्यात आलेली नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये प्रशासनाविषयी मोठ्या प्रमाणात संभ्रम निर्माण झाला आहे.
पाणी प्रश्नातून लवकरात लवकर नागरिकांची सुटका व्हावी, यासाठी प्रशासनाने लक्ष द्यावे. भेकराई नगर नागरिकांच्या लोकहिताचे काम करुन समस्या सोडवाव्यात, नागरिकांना दररोज पाणी मिळावे, अशी मागणी करण्यात आली असून दुर्लक्ष केल्यास रस्त्यावर उतरून जन आंदोलन करण्यात येईल, असा इशारा सामाजिक कार्यकर्ते रमेश निवंगुणे, नानासाहेब सुर्यवंशी, राजाभाऊ सूर्यवंशी व स्थानिक नागरिकांनी दिला आहे.





