Pune: ‘हेल्मेटसक्ती’ला मनपा कर्मचाऱ्यांचा हरताळ

पुणे – सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालये, महामंडळे, महानगरपालिका, नगरपालिका, नगरपरिषद, महाविद्यालयांतील अधिकारी, कर्मचाऱ्यांना दुचाकी वाहन वापरताना हेल्मेट वापरणे बंधनकारक करण्यात आले आहे. मात्र, महापालिकेत या नियमाला हरताळ फासला जात आहे. हे कर्मचारी हेल्मेट वापरतात किंवा नाही, या बाबत कोणतीही नोंदणी ठेवण्यात येत नसल्याचे समोर आले आहे.
सर्वोच्च न्यायालयाने स्थापन केलेल्या रस्ता सुरक्षा समितीचे अध्यक्ष माजी न्यायमूर्ती अभय सप्रे यांच्या अध्यक्षतेखाली विधानभवन येथे पुणे शहर तसेच जिल्हा व विभागातील रस्ते अपघात व पर्यायाने होणारे मृत्यू कमी करण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांबाबत नुकतीच बैठक झाली.
त्यावर प्रशासनाने हेल्मेट वापराची सक्ती करावी व वाहतूक नियमांबाबत जनजागृती करावी, अशा सक्त सूचना सप्रे यांनी दिल्या. त्यानुसार विभागीय आयुक्त डाॅ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी याबाबतचे आदेश काढले आहेत. पण, या नियमाचे मनपा कार्यालय आवारात पालन होत नसल्याची स्थिती आहे.
नियमभंग करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांवर संबंधित प्राधिकरणाने दंडात्मक कारवाई करुन त्यांच्या सेवा पुस्तकातही कारवाईची नोंद घ्यावी, अशा सूचनादेखील त्यांनी दिल्या आहेत. मात्र, महापालिका प्रशासनाकडून असे आदेशच मिळाले नसल्याचे सांगत या आदेशाला हरताळ फासण्यात आला आहे.





