Pune : महापालिका निवडणूक होणार की लांबणार

पुणे – पुणे महापालिकेच्या सभागृहाची मुदत मार्च २०२२ मध्ये संपुष्टात आलेली आहे. त्यातच प्रभाग रचना आणि ओबीसी आरक्षण हे मुद्दे न्यायालयीन प्रक्रियेत आहेत. याच कारणातून महापालिका निवडणूक झालेली नाही. परंतु, विधानसभा निवडणुकीचा निकाल पाहता एक हाती सत्ता आल्याने राज्य सरकार पालिका निवडणूक घेणार की सदर मुद्यामुळे लांबणार अशी चर्चा सुरू आहे.
काहींच्या मते एप्रिल २०२५ पर्यंत निवडणुकीची घोषणा होऊ शकते. महापालिका निवडणुकांमुळेच दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक वेळेत जाहीर करण्यात आल्याची चर्चा आहे. फेब्रुवारी महिन्यांत परिक्षा सुरू होत आहे. त्यामुळे एप्रिल महिन्यांत महापालिका निवडणूक होऊ शकेल. असा अंदाज राजकीय नेतेमंडळी व्यक्त करीत आहेत.
महापालिका निवडणूक तांत्रिक प्रक्रियेमुळे तीन वर्षांपासून रेंगाळली आहे. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीवेळीतच आयोगाने महापालिकेकडून लोकसंख्य तसेच समाविष्ट गावे आदींची मागणी मागविली होती. तसेच, विधानसभेसाठी आपापाल्या प्रभागात मतदान वाढविणाऱ्यांनाच नगरपालिकेत उमेदवारी मिळेल, त्यामुळे काम करा, असे थेट राजकीय पक्षांकडून सुचित करण्यात आले होते.
त्यामुळे विधानसभा निवडणुकीनंतर पालिकेची निवडणूक होणार, अशी चर्चा सुरू आहे. यापार्श्वभूमीवर महापालिका निवडणुकांसाठी इच्छुकांकडून चाचपणीही केली जात आहे. त्यातच महायुतीचे सरकार आल्यामुळे चार वॉर्डांचा मिळून एक प्रभाग या पद्धतीने महापालिका निवडणूका होइल, असेही अनेक जण सांगत आहेत.
प्रभागांबाबत पक्षांची भूमिका…
महापालिका निवडणुकीसाठी किती वॉर्डांचा प्रभाग असायला हवा याबाबत राजकीय मतभेद आहेत. चार वॉर्डचा मिळून एक प्रभाग असावा, अशी भूमिका भाजपने पूर्वी मांडलेली आहे. तर दोन वॉर्डचा मिळून एक प्रभाग असावा, असे राष्ट्रवादी काँग्रेसने म्हंटले आहे. आता, महायुतीत राष्ट्रवादी काँग्रेस असल्याने महापालिका निवडणुही एकत्र लढविली गेल्यास प्रभाग रचनेवरून वादाची शक्यता कमी आहे. परंतु. स्वतंत्र लढण्याचा निर्णय झाला तर या मुद्यावरून वाद होऊ शकतात, अशी चर्चा आहे.
याचिकांवरील निर्णय…
महापालिकेची प्रभाग रचना यासह मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण याबाबतच्या याचीका सर्वोच्च न्यायालयात दाखल आहेत. त्यावरील निर्णय प्रलंबित आहेत. परंतु. विधानसभेत महायुतीच्या बाजुने काैल लागल्याने महायुतीचे सरकार या याचिका निकाली काढण्यासाठी प्रयत्न करतील आणि पालिका निवडणुकही वेळेत होइल, अशी अपेक्षा इच्छुकांकडून व्यक्त केली जात आहे.





