Pune : महापालिकेच्या २६ कोटींचा कचरा

पुणे : मंगळवारी शहरात झालेल्या अवकाळी पावसाने अनेक ठिकाणी फ्लॅश फ्लडची स्थिती निर्माण झाली होती. या पावसाने पालिकेने केलेल्या नाले सफाई आणि पावसाळी गटारांच्या सफाईवर पाणी फेरले आहे. पावसाच्या पाण्यामुळे सफाई केलेल्या सर्व ठिकाणी पुन्हा कचरा आणि माती गेल्याने येथे पुन्हा एकदा स्वच्छता करून घ्यावी लागणार आहे. पावसाळ्यापूर्वी ही कामे करण्यासाठी पालिकेने २६ कोटी ५० लाख रुपयांच्या निविदा काढल्या होत्या. त्यातील ७० टक्के कामही पूर्ण झाले होते. त्यामुळे पालिकेने केलेला खर्च पाण्यात गेला आहे. यात नालेसफाईच्या १४ कोटी ५० लाख रुपये, तर पावसाळी गटारांच्या सफाईच्या १२ कोटींच्या निविदा होत्या.
४६ ठिकाणी साचले पाणी
मंगळवारी पावसाने शहरात ४६ ठिकाणी पाणी साचले. या पाण्याच्या तक्रारी आल्यानंतर पालिकेकडून पाण्याचा निचरा करण्यासाठी क्षेत्रीय कार्यालयस्तरावर नेमलेली पथके पाठविली होती. या पथकांनी रात्री उशिरापर्यंत पाण्याचा निचरा केला. शहरासाठी पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला होता. त्यामध्ये ६० मिमी ते १२० मिमी पाऊस पडण्याची शक्यता असते.
चार ठिकाणी शंभरी पार
मंगळवारी दुपारी आणि रात्री अशा दोन टप्प्यांत मुसळधार पाऊस पडला आहे. वारजेमध्ये १२० मिमी, कर्वेनगर ११३ मिमी, सहकारनगर ११४ मिमी, सनसिटी सिंहगड रस्ता ११२ मिमी अशा चार ठिकाणी १०० पेक्षा अधिक मिमी पावसाची नोंद झाली. नांदेड सिटी ७९ मिमी, धायरी ६४ मिमी, मयूर कॉलनी ७५ मिमी, बावधन ८२ मिमी, महात्मा सोसायटी ९४ मिमी असा इतरत्र पाऊस झाल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले. शहरात मुसळधार पाऊस पडल्यानंतर मदत कार्य करण्यासाठी व तुंबलेल्या पाण्याचा निचरा करण्यासाठी १५ क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत ७५० कर्मचारी काम करत होते, असा दावा आपत्ती व्यवस्थापन विभागाचे सहाय्यक आयुक्त गणेश सोनूने यांनी केला.
मध्यरात्री उशिरापर्यंत पालिकेचे कर्मचारी पाण्याचा निचरा करण्याचे काम करत होते. पावसाळी गटार, तसेच चेंबरमध्ये कचरा अडकल्याने पुन्हा एकदा शहरातील सर्व गटारे साफ करण्यात येतील.
– पृथ्वीराज बी. पी. (अतिरिक्त आयुक्त)





