Pune : महापालिका मोजणार शहरातला पाऊस

पुणे : शहरात गेल्या काही वर्षांत पावसाळ्यात अचानक अतिवृष्टी होण्याचे प्रकार वाढले आहेत. अवघ्या तासाभरातच १०० मिमी पेक्षा अधिक पाऊस पडण्याचे प्रकार वाढल्याने महापालिकेस या पावसामुळे उद्भवलेल्या पूरस्थितीवर उपाययोजना करणे शक्य होत नाही.
ही बाब लक्षात घेऊन आता महापालिकेकडूनच शहरातील पाऊस मोजला जाणार आहे. यासाठी, महापालिकेकडून शहरांत ३० ठिकाणी पर्जन्यमापक बसविण्यात येणार आहेत.
तसेच, पावसाच्या स्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी स्वतंत्र नियंत्रण कक्षही आपत्ती व्यवस्थापन विभागांतर्गत सुरू केला जाणार आहे. यासाठी सुमारे ३० लाखांचा खर्च येणार असून पुढील काही महिन्यांत ही यंत्रणा उभारली जाणार आहे.
हवामान विभाग, सीडॅकची मदत…
हवामान विभाग आणि सीडॅकच्या माध्यमातून पर्जन्यमापक बसविण्याची ठिकाणे निश्चित केली जाणार आहेत. यासाठी गेल्या काही वर्षांत कोणत्या भागात सर्वाधिक पाऊस झाला याचा अभ्यास केला जाणार आहे. यामध्ये, प्रत्येक तासाला झालेल्या पावसाच्या माहितीसह ज्या दिवशी हवामान विभागाने अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. त्या दिवशी एका ठराविक मिमी पेक्षा अधिक पाऊस झाल्यास तातडीने आपत्ती व्यवस्थापन कक्ष, संबधित क्षेत्रीय कार्यालय तसेच त्या भागातील नागरिकांनाही पावसाचा अलर्ट जाणार आहे.
पावसाळ्यापूर्वी हा प्रकल्प पूर्ण करण्याचे नियोजन आहे. त्यासाठी २०२५-२६ च्या अंदाजपत्रकात ३० लाखांची तरतूद करण्यात आली असून महापालिकेकडून या कामाचा आराखडा तयार करण्याचे कामही सुरू करण्यात आले आहे.
– गणेश सोनुणे, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी




