पुणेः गेल्या काही दिवसांपूर्वी एका संस्थेने जगभरातील वाहतूक कोंडीने त्रस्त असलेल्या शहरांची क्रमवारी जाहीर केली होती. या क्रमवारीत पुणे शहराचा वाहतूक कोंडीच्या बाबतीत जगात चौथा तर देशात तिसरा क्रमांक लागला. यामुळे पुण्यातील वाहतूक कोंडी हा विषय किती गहन झाला आहे याची प्रचिती या अहवालावरून समोर येते. आता वाहतूक कोंडीवर तोडगा काढण्यासाठी पुणे महापालिका अॅक्शन मोडवर आली असून वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी महापालिकेने मिसिंग लिंक प्रकल्प हाती घेतला आहे.
महापालिकेकडून शहरातील विकास आराखडा प्रस्तावित केलेले अनेक रस्ते आहेत. मात्र, भूसंपादनाअभावी ते पूर्ण झालेले नाहीत. तसेच अनेक रस्त्यांची कामे अर्थवट असल्याने नागरिकांना याचा मोठा त्रास होत असून लांबून वळसा घालून जावे लागते. यामुळे सहा महिन्यांपूर्वी महापालिकेने राज्य शासनाकडे १० मिसिंग लिंग आणि इतर रस्त्यांसाठी ६३७ कोटी रुपयांची मागणी केली होती. मात्र, राज्य शासनाकडून याबाबात कोणताही प्रतिसाद आलेले नाही. त्यामुळे या रस्त्यांची जोडणी रखडली असून शहरात वाहतूक कोंडीचा त्रास दिवसेंदिवस वाढतच चाललेला आहे.
६७८ मिसिंग लिंग
पुणे महापालिकेने केलेल्या सर्वेक्षणात शहरात एकूण ६७८ मिसिंग लिंग आढळून आलेल्या आहेत. या रस्त्यांची लांबी तब्बल ४५९ किलोमीटर आहे. हे रस्ते पूर्ण झाल्यास शहरातील नागरिकांना सलग १३८४ किलो मीटरचे रस्ते पूर्ण क्षमतेने वापरता येणार आहेत. परिणामी वाहतूक कोंडी कमी होण्यास मोठी मदत होईल.