Pune : महापालिका आयुक्तांचा शिस्तीचा बडगा

पुणे – राज्य शासनाच्या १५० दिवसांच्या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त नवलकिशोर राम यांनी घेतलेल्या आढावा बैठकीस चार वरिष्ठ अधिकारी गैरहजर राहिल्यामुळे त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई सुरू करण्यात आली आहे. या अधिकार्यांना कारणे दाखवा नोटीसा पाठवण्यात आल्या आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून राज्यात यापूर्वी १०० दिवसांचा कार्यक्रम राबवण्यात आला होता. त्यातून १२,५०० शासकीय कार्यालयांमध्ये ७०६ विषयांवर धोरणात्मक निर्णय घेण्यात आले. त्या अनुभवावर आधारित आता १५० दिवसांचा सुधारणा कार्यक्रम राबवण्यात येत असून, यामध्ये नागरिक सेवा अधिक सक्षम करण्यावर भर देण्यात येत आहे.
या कार्यक्रमाअंतर्गत महापालिकेच्या कामकाजाचा आढावा घेण्यासाठी आयुक्त राम यांनी बैठक आयोजित केली होती. मात्र, आरोग्य विभागप्रमुख नीना बोराडे, उपायुक्त वसुंधरा बारवे, अतिक्रमण विभागप्रमुख संदीप खलाटे आणि अभियंता जगदीश खानोरे हे कोणतीही पूर्वसूचना न देता बैठकीस अनुपस्थित राहिले.
त्यामुळे संबंधित अधिकार्यांकडून खुलासा मागवण्यात आला आहे. या प्रकरणात आता संबंधित अधिकार्यांना नोटीसीला उत्तर देणे बंधनकारक असून, प्रशासनात शिस्त पाळावी लागेल, असा स्पष्ट संदेश आयुक्तांनी दिला आहे.





