Pune : सगळीकडे चिखल आणि खड्ड्यांचा गराडा ; स्वारगेट एसटी स्थानकातील प्रवेशांना मनस्तापाचा अनुभव

पुणे – सुट्ट्यांमुळे स्वारगेट बसस्थानकावर प्रवाशांची मोठी गर्दी आहे. मुंबई, कोल्हापूर, सोलापूरसह कोकणात जाण्यासाठी प्रवाशांना स्वारगेट स्थानकात यावे लागते. स्थानकातून बाहेर पडल्यावरचा प्रवास सुसह्य असला तरी स्थानकात प्रवेश करण्यापासून बस सुरू होईपर्यंतचा प्रवास बिकट आहे. छोट्याशा अंतराचा हा प्रवास खड्डे, चिखलातून करावा लागतो.
शहराच्या मध्यवर्ती भागातील स्वारगेट स्थानकाची अवस्था एखाद्या खेडेगावातील स्थानकासारखी झाली आहे. गेल्या आठ दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे परिसरात पाणी साचले आहे. त्याचबरोबर खड्डे, चिखल, बसण्यासाठी स्वच्छ जागेचा अभाव, पिण्याचे पाणी असलेल्या जागी अस्वच्छता, दुर्गंधी असे चित्र पाहायला मिळते.
गेल्या अनेक दिवसांपासून एका प्रवेशद्वाराचे काम सुरू असल्याने स्थानकात प्रवेश करणे तारेवरची कसरत बनली आहे. मुख्य प्रवेशद्वारातून यायचे म्हटले तर अतिक्रमणाच्या वेढ्यातून मार्ग काढत खड्ड्यातून स्थानकात यावे लागते. राहिला एक मार्ग तो म्हणजे बसच्या येण्या-जाण्याचा. तेथे आधीच वाहनांची कोंडी झालेली असते.
तेथील खड्ड्यांमध्ये पावसाचे पाणी साचलेले. तेथून मार्ग काढत पुढे जावे तर मागे बसची रांग लागलेली. सोलापूर, कल्याण या बाजूच्या स्थानकाचा परिसर चिखलाने माखलेला आणि खड्ड्यांने वेढलेला. त्यामुळे प्रवाशांना स्थानकात येण्यापासून बस गाठण्याचा प्रवास हा मनस्तापाचा ठरत आहे.
किती दिवस काम
हडपसर मार्गाने आल्यावर स्वारगेट स्थानकात प्रवेश करणारा रस्ता मागील अनेक दिवसांपासून खोदून ठेवला आहे. पावसाळी लाईनचे काम सुरू आहे असे सांगितले जाते. आता पावसाळा सुरू झाला असला तरी काम काही पूर्ण झाले नाही. परिणामी प्रवाशांना तारेवरची कसरत करून आत यावे लागते. वळसा मारून यायचे म्हटले तरी तोही रस्ता कसरतीचाच बनला आहे.
पहिले पाढे पच्चावन्न
पाऊस आला की स्थानकाच्या प्रवेशद्वारावर पाणी साचणे, खड्डे आणि चिखल ही स्थिती नित्याची असते. त्याबाबत विचारणा केली असता काम सुरू आहे, लवकरच पूर्ण होईल असे सांगितले जाते. पावसाळा संपला तरी कामे पूर्ण होत नाही आणि पुढील पावसाळा येईपर्यंत पहिले पाढे पच्चावन्न अशी गत झाली आहे.
चिखल, पाणी असल्यामुळे बॅगा डोक्यावर घेऊन आत जावे लागते. अशा खड्डयांमध्ये एखाद्या पडायची शक्यता. किमान मुरूम टाकून खड्डा तरी भराण्याचे कष्ट घ्यावे. चिखलाने बरबटलेले पाय धुवायला जावे तर गाडी सुटण्याची भीती. तसेच तेथे पाणी नसेल तर चिखलाचे पाय घेऊनच प्रवास करावा लागतो.- कोमल पिसाळ, महिला प्रवासी
आम्ही कुटुंबीय सोलापूरला निघालो असता आमचा मुलगा चिखलात घसरून पडला. पावसात दरवर्षी स्थानकाची हीच अवस्था असते. कधी सुधारणार माहित नाही. प्रवाशांच्या सोयीसुविधांकडे लक्ष द्यावे असे काही वाटत नाही. भाडेवाढ करण्यातील तत्परता यावेळी दिसत नाही. – धनंजय भांगे, प्रवासी





