pune : सातारा साहित्य संमेलनाच्या मृदुला गर्ग उद्घाटिका

चार दिवसांत विविध कार्यक्रम, समारोपास रघुवीर चौधरी यांची उपस्थिती
पुणे – सातारा येथे होणाऱ्या ९९व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन भारतीय पातळीवरील ज्येष्ठ लेखिका आणि विचारवंत डॉ. मृदुला गर्ग यांच्या हस्ते होणार असून समारोपास ज्ञानपीठ विजेते ज्येष्ठ लेखक रघुवीर चौधरी यांची प्रमुख उपस्थिती असेल, अशी माहिती अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी मंडळाच्या प्रमुख कार्यवाह सुनिताराजे पवार, कोषाध्यक्ष विनोद कुलकर्णी उपस्थित होते. महाराष्ट्र साहित्य परिषदेची शाहूपुरी शाखा आणि मावळा फाउंडेशनतर्फे एक ते चार जानेवारी २०२६ मध्ये प्रसिद्ध साहित्यिक विश्वास पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संमेलन होत आहे.
पहिल्या दिवशी दुपारी तीन वाजल्यापासून कार्यक्रम होत असून ध्वजारोहण साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांच्या हस्ते होणार आहे. ग्रंथदिंडीसह ग्रंथ प्रदर्शन, कवीकट्टा आणि गझलकट्टा यांचेही उद्घाटन होणार आहे. बहुरूपी भारुड हा कार्यक्रम डॉ.भावार्थ देखणे आणि सहकारी रात्री साडेआठ वाजता सादर कतील. त्यापूर्वी स्वानंद बेदरकर निरूपण करणार आहेत.
दुसऱ्या दिवशी सकाळी १०:३० वाजता संमेलनाचे उद्घाटन मृदुला गर्ग यांच्या हस्ते होईल. यावेळी संमेलनाचे अध्यक्ष विश्वास पाटील, डॉ.तारा भवाळकर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाषामंत्री उदय सामंत, ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे, ज्येष्ठ उद्योजक फरोख कुपर, सार्वजनिक बांधकाम मंत्री व स्वागताध्यक्ष शिवेंद्रराजे भोसले, खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांच्यासह प्रा. मिलिंद जोशी, सुनिताराजे पवार, विनोद कुलकर्णी यांची उपस्थिती असेल. तिसऱ्या, चौथ्या दिवशी विविध चर्चासत्र, सन्मान, संवादात्मक कार्यक्रम, सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत.
संमेलनाची वैशिष्ट्ये
* संमेलनाच्या पूर्वसंध्येला आकर्षक चित्ररथांसह ग्रंथदिंडी
* पुस्तक दालनातूनच संमेलनस्थळी जाणारा मार्ग
* ग्रंथ प्रदर्शनाचा वाचकांना ४ दिवस लाभ
* शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा सहभाग
* संमेलनच्या पूर्वसंध्येला जिल्ह्यातील ज्येष्ठ साहित्यिकांचा सन्मान
* संमेलनाचे पूर्वाध्यक्ष, महामंडळाच्या माजी अध्यक्षांना निमंत्रण
* सरस्वती सन्मानप्राप्त साहित्यिकांनाही निमंत्रण
* साहित्य अकादमी विजेत्या बालसाहित्यकारांशी संवाद
* कवी, गझलकारांसाठी कट्टा
* समकालीन पुस्तकांवर चर्चा
* मान्यवर लेखकांच्या मुलाखती
* चाकोरीबाहेरील विषयांवर परिसंवाद
‘अटकेपार’ स्मरणिकेतून उलगडणार सातारा जिल्ह्याचे वैविध्य





