पुणे – केंद्रीय लोकसेवा आयोगाने (यूपीएससी) सुरू केलेल्या ‘प्रतिभासेतू’ या उपक्रमाप्रमाणे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) ही असा उपक्रम राबवण्याची मागणी जोर धरत आहे. यूपीएससीच्या अंतिम गुणवत्ता यादीत न आलेल्या, परंतु परीक्षेचे सर्व टप्पे पार केलेल्या उमेदवारांना सरकारी, खासगी क्षेत्रात रोजगाराची संधी दिली जाते. यामुळे त्यांच्या ज्ञानाचा योग्य ठिकाणी वापर होणार आहे. प्रतिभा सेतू म्हणजे काय ? लेखी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या पण अंतिम गुणवत्ता यादीत नसलेल्या उमेदवारांसाठी हा उपक्रम आहे. त्यांचा बायोडेटा, शैक्षणिक पात्रता, कौशल्ये आणि संपर्क माहिती प्रतिभा सेतू पोर्टलवर अपलोड केली जाते. नोकरी देऊ इच्छिणाऱ्या सरकारी किंवा खासगी संस्था याच पोर्टलवर लॉगिन करून योग्य उमेदवारांची निवड करू शकतात. हा प्लॅटफॉर्म एका डेटा बँक ‘प्रमाणे काम करतो. आतापर्यंत या पोर्टलवर हजारो उमेदवारांचा डेटा संकलित केला आहे. एमपीएससीने पुढे यावे राज्यसेवा आयोगाच्या सहाय्यक, पोलीस उपनिरीक्षकसह विविध परीक्षांमधून दरवर्षी हजारो विद्यार्थी बाहेर पडतात. प्रत्येकाची अंतमि यादीत निवड होत नाही. हे विद्यार्थी पुन्हा परीक्षेची तयारी करततात. विद्यार्थ्यांचा अभ्यासकाळ तीन ते पाच वर्षांचा असतो. त्यांनी मिळवलेले ज्ञान, अनुभव व मेहनतीचा वापर झाला नाही तर समाजाची, राज्याचीही हानी होते. एमपीएससीने प्रतिभा सेतू सदृश्य उपक्रम सुरु केला तर कंपन्या, शासकीय प्रकल्प, स्थानिक स्वराज्य संस्थांना आणि उद्योजकांना प्रशिक्षित मनुष्यबळ मिळू शकते. त्यामुळे एमपीएससीने प्रतिभासेतू सारखा उपक्रम हाती घ्यावा, अशी मागणी स्पर्धा परीक्षार्थी आयोगाकडे करत आहेत.