Pune : एमपीएससी उमेदवारांची शरद पवारांकडे धाव

पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) विविध मागण्यांसाठी आंदोलन करणाऱ्या उमेदवारांनी शनिवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवारांची भेट घेतली आणि त्यांच्याकडे आपली व्यथा मांडली. त्यानंतर उमेदवारांसमोरच एमपीएससीचे अध्यक्ष रजनीश शेठ यांना पवार यांनी फोन केला आणि उमेदवारांच्या मागण्यांबाबत चर्चा केली. त्यानंतर रजनीश शेठ यांनी उमेदवारांना भेटीची वेळ दिली आहे. त्यामुळे आता स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे उमेदवार आणि एमपीएससी प्रशासन यांच्यात थेट संवाद होणार असून, या चर्चेतून सकारात्मक निर्णय निघण्याची शक्यता आहे.
राज्य सेवा परीक्षेमध्ये तांत्रिक आणि न्यायालयीन अडचण येऊ शकतात. त्या दूर करूनच राज्य सेवा मुख्य परीक्षा घ्यावी. त्यासाठी मुख्य परीक्षा काही दिवस पुढे ढकलण्यात यावी आणि विविध पदांच्या संख्येत वाढ करावी, या प्रमुख मागणीसाठी शुक्रवारी सायंकाळी शास्त्री चौक येथे अचानकपणे उमेदवार आंदोलनास बसले. या परिसरात स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे शेकडो उमेदवार या आंदोलनात सहभागी झाले. शासनाने आमच्या मागण्या मान्य कराव्यात, यासाठी उमेदवारांना आंदोलनास बसावे लागते, ही बाब शरमेची आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया उमेदवारांनी व्यक्त केली.
दरम्यान, शुक्रवारी रात्री उशिरा उमेदवारांनी आंदोलन थांबवले. त्यानंतर सकाळी नऊ वाजता या सर्व उमेदवारांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांची मोदी बागेतील कार्यालयात भेट झाली. त्यांनी सुमारे अर्धा तास उमेदवारांशी चर्चा केली. त्यांची बाजू ऐकून घेतली आणि थेट एमपीएससीच्या अध्यक्षांना फोन केला. शरद पवारांशी फोनवरून बोलताना रजनीश शेठ यांनी विद्यार्थ्यांचे सर्व प्रश्न मार्गी लावण्यात येतील, अशी ग्वाही दिली. त्यामुळे उमदेवारांच्या मागण्यांवर काही निर्णय होईल का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
एमपीएससी राजपत्रित नागरी सेवा पूर्व परीक्षेच्या (राज्यसेवा) निकालातील गोंधळ, मुख्य परीक्षेसाठी वेळ वाढवून मिळावा, कटऑफपेक्षा अधिक गुण मिळवूनही गुणवत्तायादीत स्थान न मिळाले नाही, पोलिस उपनिरीक्षक (पीएसआय) पदांच्या जागांमध्ये वाढ करावी, अशी विविध मागण्यांसाठी उमेदवारांनी आक्रमक पवित्रा घेतला होता.





