MPCB corrupt officials : पुण्यातील प्रदूषण नियंत्रण मंडळात मोठी कारवाई; 6 अधिकारी निलंबित, आर्थिक व्यवहारांचे व्हिडिओ समोर
MPCB corrupt officials : पुण्यात महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या सहा अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई. उद्योगांना CTE आणि CTO परवानगी देताना कथित आर्थिक व्यवहार केल्याचा आरोप.

MPCB corrupt officials : महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या (MPCB) पुणे कार्यालयातील सहा वरिष्ठ आणि क्षेत्रीय अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. उद्योगांना उभारणीसाठी (CTE) आणि संचालनासाठी (CTO) परवानगी देताना कथित आर्थिक देवाणघेवाण केल्याचा आरोप या अधिकाऱ्यांवर आहे. या प्रकरणातील तक्रारींसोबत आर्थिक व्यवहारांचे व्हिडिओ पुरावेही सादर करण्यात आल्याची माहिती आहे.
निलंबित अधिकाऱ्यांमध्ये प्रादेशिक अधिकारी बाबासाहेब कुकडे, उपप्रादेशिक अधिकारी नवनाथ अवताडे, उपप्रादेशिक अधिकारी कार्तिकेय लंगोटे, क्षेत्रीय अधिकारी सुषमा कुंभार, क्षेत्रीय अधिकारी जयंत डोके आणि क्षेत्रीय अधिकारी अजय खामकर यांचा समावेश आहे.
उद्योगांना परवानगी देताना कथित आर्थिक व्यवहार झाल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती. त्यांच्याकडून खुलासाही मागवण्यात आला. मात्र, अधिकाऱ्यांनी दिलेले खुलासे समाधानकारक नसल्याचे सांगत ते फेटाळण्यात आले.
यानंतर कर्तव्यात कसूर आणि गैरवर्तन केल्याचा ठपका ठेवत सहाही अधिकाऱ्यांना विभागीय चौकशीच्या अधीन राहून तात्काळ निलंबित करण्याचे आदेश देण्यात आले. निलंबनाच्या काळात या अधिकाऱ्यांचे मुख्यालय मुंबईतील महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या मुख्यालयात निश्चित करण्यात आले आहे. तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या पूर्वपरवानगीशिवाय मुख्यालय सोडता येणार नसल्याचे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.





