Pune : रात्रीत नाकाबंदीवेळी चारवेळा पैसे उकळले

पुणे – एकाच रात्री नाकाबंदीत पोलिसांना चारवेळा पैसे द्यावे लागल्याच्या घटनेच्या चौकशीतून एका सहायक पोलिस निरीक्षकासह चौघा पोलिसांची वार्षिक वेतवाढ रोखली आहे. एका नागरिकावर चारवेळा वाहतूक पोलिसांना पैसे द्यावयाचा प्रसंग येत असेल तर नाकाबंदी गुन्हे रोखण्यासाठी आहेत की खंडणी उकळण्यासाठी आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
नेमके काय घडले?
९ डिसेंबर २०२४ रोजी नाकाबंदीत ड्रंक अॅन्ड ड्राईव्ह कारवाईवेळी अर्णव सिंघल या कारचालकावर चारवेळा वाहतूक पोलिसांना पैसे देण्याची वेळ आली. कोरेगाव पार्कमध्ये पोलिसांनी त्यांच्याकडून ५ हजार घेतले. त्याच रात्री कोरेगाव पार्क लेन नं. ७ मध्ये पबमध्ये जाताना टोईंग व्हॅनवरील पोलिसांनी १० हजार दंड सांगून अडीच हजार घेतले. यावेळी गाडी नो पार्किंगमध्ये असल्याचे सांगितले.
मध्यरात्री घरी निघाले असता पोलिसांनी ब्रेथ अॅनालायाझर चेकिंग केले. त्यावेळी अल्कोहोल नसतानाही तुम सब दारू पिये हो, असे सांगून पोलिसांनी ५ हजार घेतले. त्यानंतर जहांगीर चौकाजवळ पुन्हा नाकाबंदी दिसली. पुन्हा पोलीस पैसे उकळणार या भीतीने सिंघलने गाडी वेगात काढताना बॅरीकेटला धडक दिली.
यावेळी महिला पोलिस हवालदार दीपमाला नायर जखमी झाल्या. ५० ते ६० मीटर अंतरापर्यंत त्या फरफटत गेल्या. ही घटना नायडु हॉस्पिटल लेनमध्ये एआयएसएसएमएस कॉलेजसमोर वेलेस्ली रोड येथे घडली. यामुळे सिंघल यांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता हा घटनाक्रम उघड झाला.
चौकशीत चौघांवर ठपका
याप्रकरणी नाकाबंदीवेळी नेमके काय घडले याची चौकशी करण्याचे आदेश पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिले. चौकशीत सहायक पोलीस निरीक्षक स्वप्निल उत्तम नेवसे (नेमणूक विशेष शाखा), पोलीस हवालदार सुहास भिमराव धाडगुडे (नेमणूक लष्कर पोलीस ठाणे), पोलीस हवालदार प्रकाश दादासो कट्टे (नेमणूक, फरासखाना पोलीस ठाणे), पोलीस अंमलदार सचिन कल्याण वाघमोडे (नेमणूक विश्रामबाग पोलीस ठाणे) यांची नावे निष्पन्न झाली.
चौकशीनंतर त्यांची वार्षिक वेतनवाढ वर्षासाठी रोखण्याचे आदेश आयुक्तांनी दिले. कर्तव्य बजावताना पोलीस दलाची प्रतिमा मलीन करुन शिस्तीचे उल्लंघन करणारे अशोभनीय बेशिस्त, बेपर्वा वर्तन केल्याचा तसेच बेजबाबदार, निष्काळजी गैरवर्तनाचा ठपका त्यांच्यावर ठेवला आहे.





