पुणे : गावठाण विकासासाठी ‘पुणे मॉडेल’

पुणे – देशातील ग्रामीण भागांचा नियोजनबद्ध विकास व्हावा, यासाठी आता गावठाण क्षेत्रांच्या विकासाकरिता केंद्र सरकारने समिती स्थापन केली आहे. या समितीत “यशदा’चे महासंचालक एस. चोक्कलिंगम् आणि पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद या दोघांचा समावेश आहे.
केंद्र सरकारच्या पंचायतराज मंत्रालयाने बंगळुरू येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स संस्थेचे सल्लागार एस. एस. मीनाक्षीसंदुरम यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती स्थापन केल्याचे केंद्र सरकारने जाहीर केले आहे. गावठाणांचा विकास करण्यासंदर्भात पुणे जिल्हा परिषदेने एक प्रस्ताव तयार करून त्याचा मसुदा केंद्राला दिला होता. हा प्रस्ताव महाराष्ट्राच्या हितासाठी तयार करण्यात आला होता. त्या प्रस्तावाची केंद्राने दखल घेतली. त्यानुसार, गावठाण क्षेत्राचा विकास व्हावा यासाठी केंद्र सरकार नवीन कायदा तयार करण्याचा विचार करीत आहे. त्यासाठी केंद्र सरकारने तज्ज्ञ सदस्यांची समिती स्थापन केली आहे. समितीत डॉ. एन. श्रीधरन्, माजी केंद्रीय सचिव सुशील कुमार, डॉ. जी. नरेंद्र कुमार, नीती आयोगातील डॉ. अविनाश मिश्रा, आर. श्रीनिवास, प्रवीण नायर, डॉ. अर्णव दास गुप्ता आणि सहसचिव अलोक प्रेमनगर यांचा समावेश आहे.





