Pune MLC Election : पडद्यामागच्या हालचालींनी गड काबीज! वळसे पाटील यांच्या मध्यस्थीने काकडेंचा मार्ग मोकळा
Pune MLC Election : महायुतीचे उमेदवार विक्रम काकडे यांची विधानपरिषदेवर बिनविरोध निवड; दोन दिवसांपासून सुरू असलेल्या राजकीय नाट्यमय घडामोडींचा शेवट.

Pune MLC Election – विधानपरिषदेसाठी महायुतीचे उमेदवार विक्रम काकडे बिनविरोध निवडून आले असून, राहुल कुल आणि दिलीप वळसे पाटील यांच्या मध्यस्थीने निवडणुकीचा तिढा सुटल्याची चर्चा यानिमित्ताने सुरू झाली आहे. गेल्या दोन दिवसांपासून यानिमित्ताने राजकीय वर्तुळात सुरू असलेली खळबळ आता संपली आहे. माजी आमदार सुनील टिंगरे यांनी गुरुवारी अधिकृतपणे माघार घेतली.
त्यानंतर प्रदीप कंद आणि राष्ट्रवादीचे (शप) श्रीकांत पाटील यांनीही माघार घेतल्याने ही निवडणूक बिनविरोध होणार हे निश्चित झाले. पुणे विधानपरिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने ऐनवेळी पक्षप्रवेश दिलेल्या काकडेंना उमेदवारी दिल्याने पक्षात खळबळ उडाली. नाराजांनी अर्ज दाखल केले, तर प्रदीप कंद यांनीही भाजपकडून अर्ज दाखल केला. अखेर टिंगरे आणि कंद यांनी वरिष्ठांच्या मनधरणीनंतर अर्ज मागे घेतला.
पक्षांतर्गत नाराजी दूर करणे काकडे यांना शक्य झाले, तरी विरोधकांना माघार घेण्याला लावणे अवघड होते. मात्र, माजी मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी मध्यस्थी केल्यानंतर पाटील यांनीही अर्ज मागे घेतल्याची चर्चा आहे. दरम्यान, काकडे यांनीही नाराजांची भेट घेऊन त्यांचे मनधरणी केली. यामध्ये दीपक मानकर, नाना काटे, विलास लांडे यांचा समावेश आहे.
शरद पवार यांची मनधरणी
गुरुवारी सकाळीच वळसे-पाटील यांनी शरद पवार यांची भेट विधानपरिषद निवडणुकीसंदर्भात चर्चा केली. त्यानंतर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, तसेच विक्रम काकडे यांचे वडील संजय काकडे यांनीही शरद पवारांना फोन करून निवडणूक बिनविरोध करण्यासाठी विनंती केली होती. त्यानंतर शरद पवारांनी श्रीकांत पाटील यांना फोन करून अर्ज मागे घेण्याचे आदेश दिल्याचे समजते.
घोडेबाजाराचा संबंध नाही – काकडे
माझा विजय मी अजितदादांना समर्पित करतो. जर ते आज असते तर अधिक आनंद झाला असता. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचेही मी आभार मानतो. राष्ट्रवादी काँग्रेस शरद्चंद्र पवार पक्षात अंतर्गत काय झाले, मला माहिती नाही; परंतु माझ्या वडिलांचे शरद पवार यांच्याशी बोलणे झाले होते. पक्षाचे कुटुंब म्हणून आम्ही भाजप प्रदेशाध्यक्ष, मुख्यमंत्र्यांना भेटलो होतो.
त्यानंतर आम्ही पक्ष प्रवेशाचा निर्णय घेतला. या निवडणुकीत घोडेबाजार व्हायचा संबंधच येत नाही. आमच्याकडे ९५ टक्के मतदार आहेत. जय पवार यांना कर्ज दिल्याची चर्चा आहे. मात्र, माझ्या शेजारचा प्लाॅट पार्थ पवार यांच्या नावावर आहे. तो मला विकत घ्यायचा होता, त्यासाठी मी त्यांना ऍडव्हान्स पैसे दिले होते, ते प्रतिज्ञापत्रात नमूद केले होते.





