Pune: गुंड गजा मारणेकडून आमदार लंके यांचा सत्कार; राजकीय वर्तुळात खळबळ

पुणे – कोथरुड भागातील गुंड गजानन उर्फ गजा मारणे याने अहमदनगरचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष-शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार नीलेश लंके यांचा सत्कार केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. याबाबतचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर मारणे पुन्हा चर्चेत आला आहे. दरम्यान, लोकसभा निवडणुकीपूर्वी अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ यांनी मारणेची भेट घेतल्याची चित्रफीत प्रसारित झाली होती.
मारणे याची कोथरुड भागात दहशत आहे. खून, खुनाचा प्रयत्न, खंडणीसह अनेक गंभीर गुन्हे त्याच्याविरुद्ध दाखल आहेत. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी फेब्रुवारीत पोलीस आयुक्तपदाची सूत्रे स्वीकारली. त्यानंतर त्यांनी गजा मारणे, नीलेश घायवळ, सचिन पाेटे, बाबा बोडके टाेळीसह शहरातील वेगवेगळ्या भागात दहशत असलेल्या गुंडांना पोलीस आयुक्तालयात बोलावून त्यांना समज दिली.
गंभीर गुन्हे केल्यास कठोर कारवाईचा इशारा पोलीस आयुक्तांनी दिला, तसेच दहशत निर्माण करण्यासाठी व्हिडिओ, फोटो व्हायरल केल्यास कारवाईचा इशारा देण्यात आला होता. पोलीस आयुक्तालयात गुंड गजा मारणेला बोलावून गुन्हे शाखेतील अधिकाऱ्यांनी दम भरला. त्यानंतर गजा मारणे, नीलेश घायवळसह शहरातील वेगवेगळ्या भागात दहशत असलेल्या टोळ्यांकडून समाजमाध्यमात चित्रफीत प्रसारित करण्यात येत असल्याचे दिसून आले आहे.
घायवळला शह देण्यासाठी मारणेची चाल ?
गजा मारणे याचा निकटचा साथीदार अशी ओळख नीलेश घायवळ याची होती. कोथरुड भागात दोघांचा दबादबा आणि दहशत होती. मारणे आणि घायवळ यांच्यात वर्चस्व, आर्थिक व्यवहारातून खटके उडू लागले. मारणे आणि घायवळ टोळ्यांमध्ये वैमनस्य निर्माण झाले आणि टोळीयुद्धाचा भडका उडाला. यातूनच घायवळवर हल्ला झाला, तसेच त्याच्या साथीदारांचे खून झाले.
घायवळने मारणे टोळीवर सूड घेण्यासाठी त्याच्या सचिन कुडलेवर दांडेकर पूल गोळीबार करून त्याचा खून केला. घायवळ मूळचा नगर जिल्ह्यातील जामखेडमधील आहे. मागील काही वर्षांपासून घायवळने कर्जत, जामखेड परिसरात दबदबा निर्माण केला आहे. घायवळला शह देण्यासाठी मारणेने खासदार नीलेश लंकेंचा सत्कार करून वेगळी चाल खेळली, अशी चर्चा गुन्हेगारी वर्तुळात सुरू झाली आहे.
“पुण्यात एका सहकाऱ्याला भेटायला मारणे यांच्या घरासमोरून जात होतो. तेव्हा त्यांनी हात केला, मी थांबलो. त्यांनी चहा प्यायला घरात चला म्हणून सांगितले. आम्ही घरात जाऊन चहा घेतला. त्यानंतर त्यांनी सत्कारही केला. तोपर्यंत मला समोरील सन्माननीय व्यक्ती कोण, त्यांची पार्श्वभूमी काय आहे, हे माहिती नव्हते.” – नीलेश लंके, खासदार, अहमदनगर





