Ahilyanagar Drugs Case : अहिल्यानगरमध्ये पोलिस दलालाच काळिमा फासणारी धक्कादायक घटना समोर आली असून, एमडी ड्रग्स प्रकरणात स्थानिक गुन्हे शाखेतील पोलिस कर्मचारीच आरोपी निघाल्याने खळबळ उडाली आहे. स्थानिक गुन्हे शाखेचा पोलिस कॉन्स्टेबल श्यामसुंदर गुरव याला एमडी ड्रग्स चोरून त्याची विक्री केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. श्रीरामपूर येथे कारवाईदरम्यान जप्त करण्यात आलेल्या तब्बल २ कोटी १० लाख रुपये किमतीच्या १ किलो ५२ ग्रॅम एमडी ड्रग्सऐवजी पोलिस कोठडीत पीठ ठेवण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. हा नशेचा साठा पुढे शिरूर परिसरात विक्रीसाठी दिल्याचा आरोप गुरव याच्यावर करण्यात आला आहे. या प्रकरणात पारनेर येथील ज्ञानदेव उर्फ माऊली बाळू शिंदे याच्यावरही सुमारे २ कोटी रुपयांच्या एमडी ड्रग्स विक्रीप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपासादरम्यान ज्ञानदेव शिंदे हा राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे खासदार निलेश लंके यांचा जवळचा कार्यकर्ता असल्याची माहिती समोर आल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर ज्ञानदेव शिंदेचे खासदार निलेश लंके आणि त्यांच्या पत्नींसोबतचे फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. त्यामुळे या संपूर्ण ड्रग्स प्रकरणामागे राजकीय वरदहस्त आहे का? असा थेट सवाल उपस्थित केला जात आहे. दरम्यान, या प्रकरणामुळे माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी याआधी केलेल्या आरोपांना आता पुष्टी मिळतेय का, याकडेही राजकीय निरीक्षकांचे लक्ष लागले आहे. पोलिस दलातीलच कर्मचाऱ्याचा सहभाग आणि राजकीय कार्यकर्त्याचे नाव समोर आल्याने हे प्रकरण केवळ गुन्हेगारीपुरते न राहता, राज्याच्या राजकारणातही वादळ निर्माण करणारे ठरत आहे. या प्रकरणाचा तपास पुढे कुठल्या दिशेने जातो आणि आणखी कोणाची नावे समोर येतात, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.