Pune: दुधाचा टॅंकर व पीएमपीचा अपघात; दिवेघाटात हजोरो लिटर दूधाचे पाट

फुरसुंगी – हडपसर-सासवड मार्गावरील दिवेघाटाच्या तिसऱ्या वळणावर दूध टॅंकर व पीएमपी बसची जोरदार धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात पाच जण जखमी झाले तर दुधाचा टॅंकर उलटल्याने हजारो लिटर दूध वाहून गेले. हा अपघात पहाटे ०६:०० वाजता झाला. सकाळची वेळ असल्याने रस्त्यावर वाहनांची वर्दळ कमी होती, सुदैवाने या अपघातात जीवित हानी झाली नाही.
गोकुळ दुधाची वाहतूक करणारा टँकर (MH.09 CU 7292) सासवडच्या बाजूने येत होता तर हडपसरकडून सासवडकडे जाणारी पीएमपीची बस (MH.12 RN 5394) दिवेघाटाखालून तिसऱ्या वळणावर होती. त्यावेळी वेगाने येणाऱ्या टँकरने बसला जोरदार धडक दिली, यावेळी टँकर उलटला. टॅंकर दुधाने भरलेला असल्याने घाटात हजारो लिटर दुधाचा पाट वाहू लागला.
काही नागरिकांनी मिळेल त्या भांड्यात दूध भरून नेले. सुदैवाने या भीषण अपघातात जिवितहानी झाली नाही. टँकर चालकासह पाच जण जखमी झाले असल्याचे फुरसुंगी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक विष्णू देशमुख यांनी सांगितले. उलटलेलेा टँकर वाहतूक पोलिसांकडून रस्त्याकडेला घेण्यात आला, त्यामुळे वाहतूक कोंडी झाली नाही.





