pune : एमएचटी- सीईटी निकाल जाहीर
pune :

पहिल्या संधीच्या पीसीबी ग्रुपमध्ये ११ विद्यार्थ्यांना १०० पर्सेंटाइल
पुणे – राज्य सीईटी सेलतर्फे शैक्षणिक वर्ष २०२६-२७ मधील औषधनिर्माणशास्त्र अर्थात फार्मसी व कृषी या व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या पहिल्या संधीच्या पीसीबी समूहाचा निकाल अखेर जाहीर झाला आहे. या निकालात एकूण ११ विद्यार्थ्यांनी १०० पर्सेंटाइल गुण मिळवून घवघवीत यश संपादन केले आहे.
विशेष म्हणजे, १०० पर्सेंटाइल मिळविणारे सर्व ११ विद्यार्थी महाराष्ट्रातीलच असून, यात एकाही परराज्यातील विद्यार्थ्याचा समावेश नाही. यामध्ये ८ विद्यार्थी आणि ३ विद्यार्थिनींचा समावेश आहे. हा निकाल विद्यार्थ्यांच्या लॉगीनमध्ये उपलब्ध करून देण्यात आला असून, प्रत्यक्ष प्रवेश प्रक्रिया लवकरच सुरू होणार असल्याची माहिती सीईटी सेलने दिली आहे.
यंदा २१ ते २६ एप्रिल २०२६ दरम्यान राज्यातील ३६ जिल्ह्यांमधील १८६ केंद्रांवर संगणकाधारित पद्धतीने ही परीक्षा पार पडली.
एकूण ६ दिवसांत ११ सत्रांमध्ये घेण्यात आलेल्या या परीक्षेसाठी २ लाख ८४ हजार ०६३ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी २ लाख ६३ हजार २१३ विद्यार्थ्यांनी (९२.६६ टक्के उपस्थिती) प्रत्यक्ष परीक्षा दिली. यंदाच्या परीक्षेत मुलांपेक्षा मुलींची संख्या लक्षणीय होती. परीक्षा देणाऱ्यांमध्ये १ लाख ३ हजार ३६० विद्यार्थी, १ लाख ५९ हजार ८४८ विद्यार्थिनी आणि ५ तृतीयपंथीय उमेदवारांचा समावेश होता.
१०० पर्सेंटाइल मिळवणारे मानकरी
राज्यातून अव्वल ठरलेल्या ११ जणांमध्ये आदित्य सोमाणी (नागपूर), झील छेडा (पालघर), ॲशले फर्नांडिस (मुंबई शहर), अथर्व गडदे (कोल्हापूर), प्रतीक्षा गाढवे (सोलापूर), अथर्व काकुळडे (धुळे), सार्थक पाटील (सांगली), साहिम पटवेगर (कोल्हापूर), राशी चोप्रा (पुणे), सौरीश सेन (ठाणे) आणि वरद वैद्य (पुणे) यांचा समावेश आहे.
प्रवर्गनिहाय गुणवत्ता यादी
खुला प्रवर्गातून आदित्य सोमाणी, झील छेडा, ॲशले फर्नांडिस, सार्थक पाटील, राशी चोप्रा, सौरीश सेन आणि वरद वैद्य यांनी १०० पर्सेंटाइल मिळवले. ओबीसी प्रवर्गातून प्रतीक्षा गाढवे, अथर्व काकुळडे व साहिम पटवेगर, तर एनटी २ प्रवर्गातून अथर्व गडदे यांनी १०० पर्सेंटाइल गुणांसह बाजी मारली. इतर प्रवर्गांमध्ये वैदेही कांबळे (एससी – ९९.९९), भावेश चव्हाण (एसटी – ९९.९८), पूनम नेमाने (एसबीसी – ९९.९९), समीर जाधव (एसईबीसी – ९९.९९), गिरीश गोठवाल (व्हीजे – ९९.९७), प्रसाद पुरी (एनटी १ – ९९.९८) आणि विश्वजीत लाटे (एनटी ३ – ९९.९४) हे आपापल्या प्रवर्गात राज्यात सर्वोच्च राहिले आहेत.





