Pune Metro: मंडईत तासाला ३० हजार गणेशभक्तांचा महापूर
Pune Metro:

मेट्रोमुळे गणेशोत्सवातील गर्दीचे गणित बदलणार; मंडई, तुळशीबाग, लक्ष्मी रस्त्यावरील नियोजनाचे मोठे आव्हान
Pune Metro: गणरायाच्या दर्शनासाठी यंदा भाविकांची पावले रस्त्यांपेक्षा मेट्रोच्या दिशेने अधिक वळणार आहेत. दर पाच मिनिटांनी मेट्रो धावल्यास तासाला ३० हजार प्रवाशांचा ओघ मंडई परिसरात येऊ शकतो. त्यामुळे वाहनांची कोंडी कमी होण्याची शक्यता असली, तरी मंडई, पेठांच्या रस्त्यांवर उसळणाऱ्या गर्दीचे नियमन करणे पोलिसांसाठी मोठे आव्हान ठरणार आहे.
गणेशोत्सवासाठी अवघे काही दिवस उरले असून गौरी-गणपतीनंतर प्रमुख गणेश मंडळांचे देखावे पाहण्यासाठी मध्यवर्ती पुण्यात भाविकांची मोठी गर्दी होणार आहे.यापूर्वी बहुतांश नागरिक दुचाकी, चारचाकी अथवा बसने शहरात येत असल्याने वाहनतळ, वाहतूक कोंडीचा प्रश्न पोलिसांसमोर असायचा. यंदा मेट्रोमुळे गर्दी स्थानकांकडे आणि तेथून पेठांमध्ये वळण्याची शक्यता आहे.
गणेशोत्सवात मेट्रोच्या फेऱ्या वाढविण्याचे नियोजन आहे. दर पाच मिनिटांनी मेट्रो धावल्यास तासाला ३० हजार प्रवासी प्रवास करतील. मंडईपासून दोन ते अडीच किलोमीटरच्या परिसरात २० ते २५ प्रमुख गणेश मंडळे आहेत. त्यामुळे मंडईतून भाविकांची गर्दी थेट लक्ष्मी रस्ता, तुळशीबाग, शनिवारवाडा आणि पेठांच्या दिशेने जाणार आहे.
सध्या पुणे मेट्रोमधून दररोज एक ते दीड लाख प्रवासी प्रवास करतात. गणेशोत्सवात हा आकडा साडेचार लाखांपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. परिणामी मेट्रो स्थानकांबरोबरच स्थानकाबाहेरील रस्ते आणि प्रमुख दर्शन मार्गांवर गर्दीचा मोठा ताण असेल.
मंडई स्थानकावर एकाच वेळी गर्दी होऊ नये, यासाठी पिंपरी-चिंचवडच्या दिशेने येणाऱ्या काही मेट्रो थेट स्वारगेटपर्यंत नेण्याचा पर्याय चर्चेत होता. मात्र, मेट्रोची यंत्रणा केंद्रीकृत असल्याने इच्छेनुसार गाडी थांबविणे किंवा न थांबविणे सहज शक्य नाही.
शिवाय मंडईचे तिकीट काढलेल्या प्रवाशाला स्वारगेट येथे उतरविल्यास पुढील प्रवासाच्या भाड्याचा प्रश्नही निर्माण होतो. मेट्रो प्रशासन, पुणे पोलिस आणि पालिकेतील समन्वयावर गर्दीचे नियोजन अवलंबून असणार आहे.
फोकस एरिया
गणेशोत्सवात भाविकांची गर्दी मंडई, लक्ष्मी रस्ता, तुळशीबाग, शनिवारवाडा आणि लगतच्या पेठांमध्ये असणार आहे. मेट्रो स्थानकाबाहेर गर्दीचे विभाजन करणे, भाविकांना वेगवेगळ्या मार्गांनी पुढे पाठविणे, गर्दी एका ठिकाणी थांबू नये, आपत्कालीन परिस्थितीत मार्ग मोकळा ठेवणे, यासाठी पोलिसांना विशेष नियोजन करावे लागणार आहे.
वाहतूक कोंडीऐवजी यंदा पादचारी गर्दीचे आव्हान पोलिसांसमोर असणार आहे. त्यामुळे मेट्रोमुळे गणेशोत्सवातील गर्दी नियंत्रणाचे नवे गणित पोलिसांना सोडवावे लागणार असून त्यादुष्टीने नियोजन सुरु आहे.




