Pune: मेट्रो प्रवाशांना करावी लागते प्रतीक्षा

पुणे – महामेट्रोच्या रामवाडी आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिका स्थानकावर तिकीट स्कॅनिंग मशिनची संख्या कमी असल्यामुळे बाहेर जाणाऱ्या प्रवाशांना बराच वेळ ताटकळत राहावे लागत आहे. त्यानंतर या स्थानकांवर एक तर या तिकीट स्कॅनिंग मशिनची संख्या वाढवण्याची किंवा बाहेर जाताना तिकीट स्कॅनिंग न करण्याची मागणी नागरिक करीत आहेत.
विशेषत: सकाळी ९ ते ११ आणि संध्याकाळी ६ ते ८ या वेळेत दोन्ही मार्गांवर मोठ्या प्रमाणात प्रवाशांची गर्दी असते. त्यामुळे बाहेर पडताना रांगा लागल्याचे पाहायला मिळते. पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट आणि रामवाडी ते वनाज या दोन मार्गिकांवर मेट्रो सेवा दिली जाते. या दोन्ही मार्गिकेंवर सध्या दिवसाला १.८ ते २ लाखांपर्यंत प्रवासी प्रवास करतात.
प्रवाशांनी तिकीट खरेदी केल्यानंतर फलाटवर जाण्याआधी एकदा आणि प्रवास पूर्ण झाल्यानंतर बाहेर जाताना एकदा मशीनवर तिकीट स्कॅनिंग करावे लागते. स्थानकात येण्यासाठी आणि बाहेर जाण्यासाठीच्या मार्गांच्या जवळच तपासणी मशिन लावल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांचा प्रवास झाल्यानंतर बाहेर पडण्यासाठी प्रवाशांना ताटकळत राहावे लागते.
शेवटच्या स्थानकावर होतेय गर्दी
स्वारगेट आणि वनाज या दोन्ही स्थानकांवर या मशिनची संख्या पुरेशी आहे. मात्र, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका स्थानकावर बाहेर पडताना तिकीट तपासणीसाठी तीन, तर रामवाडी स्थानकावर चार मशिन आहेत. ही स्थानके दोन्ही मार्गांवरील शेवटची स्थानके असल्याने या स्थानकांवर मेट्रो प्रवास झाल्यानंतर बाहेर जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी असते. त्यात ही संख्या गर्दीच्या वेळी वाढते. अशावेळी या स्थानकांवर उपलब्ध तिकीट स्कॅनिंग मशिनवर मोठ्या रांगा लागतात. तर अनेकदा तिकिट स्कॅन न झाल्यास ही रांग थांबूनच राहते.
‘पीसीएमसी मेट्रो स्टेशन हे सर्वाधिक प्रवासी असणारे स्थानक आहे. तरीसुद्धा या स्टेशनवर बाहेर पडण्यासाठी फक्त तीन तिकीट स्कॅनर मशिन आहे. त्यामुळे स्टेशनवर भरपूर गर्दी होते. पुण्यातील इतर स्टेशनवर गर्दी कमी असूनदेखील तिकीट स्कॅनिंग मशिन अधिक आहेत. कृपया पीसीएमसीमधील तिकीट स्कॅनिंग मशिन वाढवण्यात यावे ही विनंती.’ – संदीप ( प्रवासी)
‘मेट्रोने प्रवास करण्यापूर्वी आपण तिकीट स्कॅन केल्यानंतरच पुढे मेट्रो स्टेशनमध्ये प्रवेश मिळतो आणि बाहेर पडतानाही आपल्याला तिकीट स्कॅन करावं लागतं. मी युरोपमध्ये काही ठिकाणी मेट्रोने प्रवास केला आहे. तेव्हा तिथे बाहेर पडताना तिकीट स्कॅन करण्याची गरज भासत नव्हती. महामेट्रोने याकडे लक्ष द्यावे. तिकीट स्कॅन करण्याऐवजी फक्त सेंसर बसवले तरीही पुरेसे आहे.’ – अविनाश नेरूरकर ( प्रवासी)





