Pune Metro Parking – मेट्रोने प्रवास करणाऱ्या नागरिकांना भेडसावणाऱ्या पार्किंगवर उत्तर शोधण्यासाठी आता पालिकेने पुढाकार घेतला आहे. मेट्रो स्थानक परिसरात आणि स्थानकापासून पाचशे मीटर अंतरात असलेल्या ३४ ॲम्नेनिटी स्पेसची पाहणी महापालिकेने केली असून त्यातील ३१ ठिकाणी पार्किंग विकसित करण्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करण्यासाठी मेट्रो कार्यरत झाली आहे. त्याचे पुणेकरांनी स्वागत करत चांगला प्रतिसादही दिला आहे. मात्र, मेट्रो स्थानकापर्यंत पोहोचल्यावर त्या परिसरात वाहने पार्क करण्यासाठी नागरिकांना जागाच नाही, अशी परिस्थिती अनेक ठिकाणी आहे. त्यामुळे मेट्रोने प्रवास करताना नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळे मेट्रो प्रवास टाळणाऱ्या नागरिकांना मेट्रोकडे वळविण्यासाठी आणि वाहतुकीची कोंडी कमी व्हावी यासाठी महापालिकेने पुढाकार घेतला आहे. शहरात सध्या मेट्रोच्या दोन मार्गिका कार्यरत आहेत. त्यापैकी महामेट्रोमार्फत वनाज ते रामवाडी तसेच पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट हे मार्ग नागरिकांसाठी सुरू करण्यात आले आहेत. पीएमआरडीएमार्फत हिंजवडी ते शिवाजीनगर या मार्गाचे काम सुरू असून लवकरच हा मार्गही नागरिकांसाठी खुला करण्यात येणार आहे. महामेट्रोने सुरू केलेल्या दोन्ही मार्गांना प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत असून दररोज सुमारे दीड लाख ते दोन लाख पुणेकर प्रवास करत आहेत. मेट्रोने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या आणखी वाढवण्यासाठी स्थानक परिसरात पार्किंग व्यवस्था असणे आवश्यक असल्याचे वारंवार समोर आले आहे. त्यासाठी महामेट्रो आणि पुणे महापालिका संयुक्तपणे प्रयत्न करत आहेत. पुणे मेट्रो “मेट्रोच्या तिन्ही मार्गांवर पार्किंग उपलब्ध करून देण्यासाठी महापालिकेने पुढाकार घेतला आहे. शहरातील ३४ ॲम्नेटी स्पेसच्या जागा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने विचार करण्यात आला आहे. पाहणीनंतर मेट्रो स्थानकांच्या ५०० मीटर परिसरात (टीओडी क्षेत्रात) असलेल्या ३१ ॲम्नेटी स्पेस पार्किंगसाठी उपलब्ध करून देता येऊ शकतात, हे स्पष्ट झाले आहे. आता त्याच्या विकासासाठी प्रयत्न सुरू असून चार ठिकाणे पार्किंगसाठी आधीच उपलब्ध करून दिली आहे. यामुळे पुणेकरांना पार्किंग समस्येवर काही प्रमाणात दिलासा मिळणार आहे.” – दिनकर गोजारे, प्रकल्प विभाग प्रमुख, पुणे महापालिका वाकड-कात्रज-शेवाळेवाडी मार्गाचा डीपीआर शहरात मेट्रोचे जाळे अधिक विस्तारित करण्यावर भर दिला जात आहे. सध्या सुरू असलेल्या मार्गांव्यतिरिक्त पीसीएमसी ते भक्ती-शक्ती निगडी या मार्गाचे काम सुरू आहे. त्यानंतर स्वारगेट ते कात्रज या मार्गाचे कामही सुरू झाले आहे. वनाज ते चांदणी चौक मार्गाचे काम लवकरच सुरू होणार आहे. तसेच खडकवासला–स्वारगेट–मगरपट्टा–खराडी आणि हिंगणे ते नळस्टॉप या मार्गांवरही प्रक्रिया सुरू आहे. आता वाकड–कात्रज–शेवाळेवाडी या नव्या मार्गाचा प्रस्ताव महापालिकेकडे प्राप्त झाला असून, या मार्गाचा डीपीआर तयार करण्याला हरकत नसल्याचे महापालिकेने महामेट्रोला पत्राद्वारे कळविले आहे. महामेट्रोकडून प्रथम व्यवहार्यता (फिजिबिलिटी) तपासून त्यानंतर डीपीआर तयार करण्याचा निर्णय घेतला जाणार आहे.