Pune Metro : हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रोची चाचणी यशस्वी; ‘या’ तारखेपासून सेवा सुरू होण्याची शक्यता
Pune Metro : हिंजवडी आयटी पार्कमधील हजारो कर्मचाऱ्यांचा वेळ वाचणार; स्थापत्य काम पूर्णत्वाकडे असून आता तांत्रिक तपासणीवर भर.
Pune Metro – पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) हिंजवडी ते शिवाजीनगर या २३ कि. मी. लांबीच्या मेट्रोच्या चाचण्या यशस्वीरीत्या पूर्ण झाल्या आहेत. या महत्त्वपूर्ण टप्प्यामुळे एप्रिल २०२६ अखेरपर्यंत हा मार्ग टप्प्याटप्प्याने प्रवाशांसाठी खुला होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.
यामुळे हिंजवडीतील आयटी पार्कमध्ये जाणाऱ्या हजारो कर्मचाऱ्यांचा प्रवास वेगवान आणि सुलभ होणार आहे. पीएमआरडीएने मेट्रो मार्गावर दोन्ही दिशांनी मेट्रोची चाचणी घेतली. हिंजवडी परिसरात होणारी प्रचंड वाहतूक कोंडी होते. मात्र, मेट्रो सेवा सुरू झाल्यावर हा प्रवास केवळ सुखकरच नाही, तर वेळेची मोठी बचत करणारा ठरेल.
प्रकल्पाचे सुमारे ९० टक्के स्थापत्य काम पूर्ण झाले असून, आता व्यावसायिक सेवेसाठी मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्तांकडे परवानगी मागण्यात आली आहे, अशी माहिती प्राधिकरणाच्या अधिकार्यांनी दिली. तसेच, सर्व स्थानके एकाच वेळी सुरू न करता, ज्या स्थानकांचे काम १०० टक्के पूर्ण झाले आहे, ती प्रथम प्रवाशांसाठी खुली केली जातील, असेही अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.





