Pune : कॅन्टोन्मेंटचे महापालिकेत विलीनीकरण?

पुणे – महापालिका निवडणुकीसाठी प्रभाग रचना करण्याचे वेळापत्रक जाहीर झाले असून, प्रभाग रचनेचे काम सुरू असतानाच आता महापालिका हद्दीत पुणे व खडकी कॅन्टोन्मेंटच्या हद्दींचा समावेश केला जाण्याची शक्यता आहे. याबाबत निर्णय घेण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज (गुरुवारी) महत्त्वाची बैठक बोलावल्याची माहिती महापालिका प्रशासनाकडून देण्यात आली.
पुणे, खडकी कॅन्टोन्मेंटसह राज्यातील अन्य कॅन्टोन्मेंट बोर्डांच्या हद्दीतील नागरी परिसर संबंधित कॅन्टोन्मेंटजवळील स्थानिक स्वराज्य संस्थेत विलीनीकरण करण्यासंदर्भात मागील चार ते पाच वर्षांपासून चर्चा सुरू आहे.
महापालिकेकडून अहवाल सादर
मागील वर्षी राज्य सरकारने महापालिका प्रशासनाला यासंदर्भात कॅन्टोन्मेंट प्रशासनासमवेत बैठक घेऊन अहवाल सादर करण्यास सांगितले होते. त्यानुसार महापालिका प्रशासनाने डिसेंबर महिन्यात पुणे व खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसमवेत लष्कराच्या दक्षिण मुख्यालयात बैठक घेऊन लोकसंख्या, मिळकती, कर्मचारी, त्यांचे वेतन, निवृत्तिवेतन यांसह आर्थिक बाबींवर चर्चा केली होती.
महापालिकेने यासंदर्भात आपली भूमिका राज्य शासनास अहवालाद्वारे कळवली असून, त्यावर अद्याप शासनाकडून कोणताही निर्णय झालेला नाही. असे असतानाच आता राज्याचे पावसाळी अधिवेशनादरम्यान याबाबत बैठक बोलविण्यात आल्याने महापालिकेची हद्द आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
या मुद्द्यांवर चर्चेची शक्यता
कॅन्टोन्मेंट विलीनीकरण झाल्यास लष्करी परिसर वगळून उर्वरित नागरी भाग महापालिकेत येऊ शकणार आहे. पुणे कॅन्टोन्मेंटमध्ये ३६२, तर खडकी कॅन्टोन्मेंटमध्ये ३४५ कर्मचारी कार्यरत आहेत. केंद्र शासनाच्या सेवेत ६० व्या वर्षी सेवानिवृत्ती आहे. त्यानुसार त्यांचे वेतन, वेतन आयोग वेगळे आहेत, तर महापालिकेत ५८ व्या वर्षी सेवानिवृत्ती आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांचा समावेश, लष्करासाठी कोणते रस्ते महत्त्वाचे आहेत, भूसंपादनाच्या प्रकरणांचे काय करायचे? या विषयांवर चर्चा होण्याची शक्यता आहे.
प्रभाग रचनेचे वेळापत्रक बदलणार
एका बाजूला महापालिकेच्या प्रभाग रचनेचे काम सुरू झाले आहे. हे काम महापालिकेच्या जुन्या हद्दीनुसार सुरू असतानाच पुन्हा कॅन्टोन्मेंटचा समावेश महापालिकेत केल्यास हद्द आणि लोकसंख्येत बदल होणार आहे. त्यासाठी पुन्हा नव्याने प्रक्रिया करावी लागणार आहे. त्याचा परिणाम प्रभाग रचनेचे वेळापत्रक बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या बैठकीत या विषयावरही चर्चा होण्याची शक्यता आहे.





