Pune : २४ तासांत पारा ४२ अंशावर

पुणे : शहरातील लोहगाव परिसरात गेल्या २४ तासांत कमाल तापमानात एक अंशाने वाढ झाली असून, पारा जवळपास ४२ अंशावर जावून पोहचला. त्यामुळे सोमवारी (दि. १४) दिवसभर उन्हाचा चटका आणि उकाडाही जाणवत होता.
शहरासह जिल्ह्यात मागील चार ते पाच दिवसांपासून ऊन आणि ढगाळ वातावरणाचा लपंडाव सुरू असल्यामुळे कमाल तापमानात दोन ते तीन अंशाने घट झाली होती. जिल्ह्यासह शहरातील काही भागात विजांच्या कडकडाटासह पाऊस झाल्यामुळे त्यामुळे दिवसभर ऊन आणि रात्री हवेत गारवा जाणवत होता. मात्र, गेल्या २४ तासांत हवामानात झालेल्या बदलामुळे आज दिवसभर शहरातील आकाश निरभ्र होते. परिणामी कमाल तापमानात एक ते दीड अंशाने वाढ झाल्यामुळे चटका वाढलेला होता.
लोहगांव येथे सर्वाधिक ४१.८ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली असून, आठवड्याभरापासून लोहगावात उकाडा आहे. त्यापाठोपाठ तळेगांव ढमढेरे येथे ३९.९, बारामती ३९.४, शिवाजीनगर आणि पाषाण येथे ३९.२, कोरेगांव पार्क आणि मगरपट्टा ३८.९, हडपसर ३८.८, राजगुरूनगर ३८.७, वडगांवशेरी ३८.४, एनडीए ३७.६, दापोडी ३७, हवेली ३६ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली.
दरम्यान, शहरासह जिल्ह्यात पुढील दोन ते तीन दिवस हवामान कोरडे राहील. आकाश निरभ्र तर कमाल तापमानात काही अंशी वाढ होईल. दिवसभर ऊन आणि दुपारनंतर ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता पुणे वेधशाळेने वर्तविली आहे.





