पुणे : तुळशीबाग उत्स्फूर्त बंदच्या आठवणी दोन वर्षांनंतरही ताज्या

पुणे – गर्दी म्हणजे तुळशीबागेचा आत्मा! तुळशीबाग कधीच पूर्णपणे बंद नसते आणि ती एकदम उत्स्फूर्तपणे बंद ठेवण्याचा निर्णय घेणे म्हणजे दिव्यच. पण अशाही परिस्थितीत निर्णय घेऊन तुळशीबाग तीन दिवस बंद ठेवली. या घटनेला बुधवारी दोन वर्षे पूर्ण होतील; परंतु या आठवणी अजूनही मनात ताज्या असल्याची भावना येथील व्यापाऱ्यांनी व्यक्त केली.
9 मार्च 2020 रोजी राज्यातील पहिला करोना रुग्ण पुण्यात सापडला. त्यावेळी एवढी गंभीर परिस्थिती असेल असे वाटले नाही. वुहानमधील हाहा:कारही बातम्यांच्या माध्यमातून पहात होतो. 15 मार्च रोजी पोलिसांनी “तुळशीबाग व्यापारी असोसिएशन’शी चर्चा केली आणि तीन दिवस तुळशीबाग बंद ठेवण्याचे आवाहन केले.
तसेही मार्च महिन्यात परीक्षांमुळे ग्राहकसंख्या कमी असते, त्यामुळे पोलिसांच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन 16 ते 18 मार्च 2020 या कालावधीत तुळशीबाग बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. तो बंद अधिक वाढला आणि 22 मार्च रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक दिवसाचा बंद पाळण्याचे आवाहन केले. परंतु, नंतर 24 मार्चपासून रितसर लॉकडाऊन सुरू झाले.
त्यानंतर मात्र या गंभीर परिस्थितीची जाणीव होण्याला सुरुवात झाली. गणेशोत्सवाची धामधूम संपल्यानंतर विसर्जनाच्या दुसऱ्या दिवशी तुळशीबाग बंद असते, परंतु त्या आधी तेथे प्रचंड लगबग असते. त्यानंतरची शांतता ही कधीच खायला उठत नाही, तर ती श्रमपरिहारासारखी वाटते. परंतु लॉकडाऊनची शांतता भयाण वाटत असे, अशी प्रतिक्रिया “तुळशीबाग व्यापारी असोसिएशन’चे अध्यक्ष नितीन पंडीत यांनी दिली.
आयसोलेशन, कोविड टेस्ट, आरटीपीसीआर, क्वारंटाइन, सोशल डिस्टन्स, रेमडेसिविर असे सर्वसमान्यपणे न ऐकलेले शब्द कानावर पडू लागले. या टेस्ट कोठे करायच्या, बेडसंदर्भात विचारणा सुरू झाली. पोलिसांशी बोलून अनेकांना डॉक्टरांचे प्रमाणपत्र देऊन मूळगावी जाण्याला मदत केली. तुळशीबागेत उत्तर प्रदेश, बिहार यासारख्या भागांतील शंभरपेक्षा जास्त व्यक्ती काम करत होत्या. त्यांच्यासाठी अन्नधान्याची, तर दुसरीकडे अंत्यविधीसाठीही मदत करण्यात आली. “जय गणेश व्यासपीठ’च्या माध्यमातून कोविड कक्षही सुरू केला.
लॉकडाऊन शिथील झाला तशी तुळशीबाग उघडण्याविषयी चर्चा झाली. सोशल डिस्टन्सिंग पाळून व्यवसाय करणे कठीण होते. त्यातूनही व्यापाऱ्यांनी मार्गक्रमण केले आणि परिस्थिती पूर्वपदावर आणली, अशी भावना पंडीत यांनी व्यक्त केली.





