पुणे – पाणी कमी दाबाने येत असल्याच्या तक्रारी शहराच्या वेगवेगळ्या भागातून महापालिकेकडे करण्यात येतात. या तक्रारीनंतर महापालिकेच्या क्षेत्रीय कार्यालयाकडून नेमलेले पाणी पुरवठ्याचे पथक पाण्याचा दाब तपासण्यासाठी संबंधित भागातील जलवाहिनीसाठीचा रस्ता खोदून जलवाहिनीला टॅब मारून पाण्याचा दाब तपासतात. अशा, कामासाठी शहरात वर्षभरात जवळपास अडीच हजार ठिकाणी खोदाई केली जाते.
त्यानंतर, या खोदाईच्या दुरूस्तीसाठी जवळपास पाच ते सात हजारांचा खर्च येतो. मात्र, आता ही खोदाई महापालिका हद्दपार करणार असून पाण्याचा दाब तपासण्यासाठी आता प्रेशर गेजचा वापर करणार आहे. या गेजच्या माध्यमातून थेट नळालाच पाण्याचा प्रेशर मोजता येत असल्याने महापालिकेस एकाच भागात दोन नळजोड तपासले तरी पाण्याचा दाब अवघ्या मिनिटांत समजणार आहे. पाणी पुरवठा विभागाकडून प्रायोगिक तत्वावर हे प्रेशर गेज वापरण्यात येत असून लवकरच त्याची खरेदी केली जाणार आहे.
खड्डे बुजविण्याचा लाखोंचा खर्च वाचणार
शहरातील जलवहिन्यांचे जाळे ३० ते ४० वर्षे जुने आहे. यातील काही जलवाहिन्या महापालिकेकडून बदलण्यात येत आहेत. मात्र, अनेक जुन्या जलवाहिन्या खराब झाल्याने अथवा त्यात अडथळे आल्याने नागरिकांच्या सोसायट्यांच्या संपवेल अथवा वैयक्तिक नळजोडांना पुरेसे पाणी येत नाही, अशा वेळी नागरिक महापालिकेकडे तक्रार करतात. या तक्रारीच्या समस्या सोडविण्यासाठी महापालिकेने १५ क्षेत्रीय कार्यालयांच्या ठिकणी १५ पथके नेमली आहेत.
पाणी कमी येत असल्यास संबंधित जलवाहिनीपासून प्रत्येक ५ ते ६ फूटांवर खड्डे घेत जलवाहिनीला पाणी आहे की नाही, याची तपासणी केली जाते. अनेकदा दहा पेक्षा अधिक खड्डे घ्यावे लागतात. नंतर हे खड्डे बुजवून पुन्हा रस्ताही करावा लागतो. या सर्व कामासाठी मजूर, अभियंते साहित्य यावर जवळपास प्रतीखड्डा महापालिकेस ५ ते ७ हजारांचा खर्च करावा लागतो. हा खर्च वर्षाला जवळपास ७० ते ७५ लाखांचा असतो.
प्रेशर गेजची किंमत
महापालिकेकडून प्रायोगिक तत्वावर वापरण्यात येणार्या या प्रेशर गेजची किंमत सुमारे ९ ते १० हजारांच्या आसपास आहे. त्यामुळे महापालिका सुमारे ७० ते ७५ प्रेशर गेज घेणार असून त्यासाठी अवघा सात लाखांचा खर्च महापालिकेस करावा लागणार आहे. तसेच, हे गेज वर्षानुवर्षे चालतात त्यामुळे पालिकेस प्रत्येक वर्षी नव्याने खरेदी करावे लागणार नसल्याने महापालिकेची आर्थिक बचतही होणार आहे.