pune : उठसूठ मकोका; अल्पवयीनांच्या पथ्थ्यावर!

गुन्हेगारी संपवली का, की नवे गुन्हेगार जन्माला घातले?
संजय कडू
पुणे – पुण्यातील गुन्हेगारी जगतामध्ये मागील काही वर्षांत मोठा बदल दिसून येत आहे. एकेकाळी पोलिसांच्या “मकोका”च्या कारवाईमुळे कुख्यात गुन्हेगारांच्या टोळ्यांचा अंमल संपल्यासारखा वाटत होता. सोनसाखळी चोर असो वा दुचाकी चोर सर्वांवर कठोर मकोका लागू करून त्यांना कारागृहात डांबण्यात आले. परंतु, या अतिरेकाचा अनपेक्षित दुष्परिणाम समाजात उमटू लागला आहे. सराईत गुन्हेगार तुरुंगात गेल्याने त्यांच्या जागी कोणताही ‘भाई’ उरला नाही. गल्लीबोळांवर धाक ठेवणारे लोक नाहीसे झाले आणि हाच मोकळा परिसर आणि झालेली स्पेस गुन्हेगारीकडे झुकलेल्या अल्पवयीन मुलांसाठी सोन्याची संधी ठरली.
हे अल्पवयीन मुले आता स्वतःला “एरियाचा भाई” समजून हिंसक मार्गाकडे वळले आहेत. गल्लीतल्या छोट्या भांडणांतून सुरुवात झालेली त्यांची गुन्हेगिरी आता हप्तेगिरी, वाहन तोडफोड, आणि किरकोळ कारणावरून वार करण्यापर्यंत पोहोचली आहे. अनेक प्रसंगी, तुरुंगातील काही जुन्या गुन्हेगारांनी आपली टोळी जिवंत ठेवण्यासाठी या मुलांशी संपर्क साधला. मोबाईलच्या माध्यमातून आदेश गेले आणि भाईच्या नावाखातंर गेम खेळले जाऊ लागले. आता फक्त गाडी, कपडे, बाटली आणि बिर्याणीच्या बदल्यात खून होतात, ही वस्तुस्थिती पोलिसांनाही हादरवणारी आहे.
गुन्हेगारीचा हा “नवा चेहरा” पोलिसांसाठी डोकेदुखी ठरत आहे. कारण हे अल्पवयीन मुलगे कायदेशीरदृष्ट्या बाल गुन्हेगार असल्याने त्यांच्यावरची कारवाई मर्यादित राहते. त्यातूनच ते पुन्हा बाहेर येऊन गुन्हेगारीचा नवा अध्याय सुरू करतात. समाजातील भयाचा तोल बिघडवणारी ही नवी पिढी मोबाईल, इंस्टाग्राम रिल्स आणि रॅपर संस्कृतीच्या नादात “भाईगिरी”चं आकर्षक जीवन जगत आहे. पण, या आकर्षणाच्या मागे उभा आहे एक सामाजिक स्फोटक प्रश्न जो की अनुत्तरित आहे. त्यामुळे उठसूठ मकोका लावून आपण गुन्हेगारी संपवली का, की नवे गुन्हेगार जन्माला घातले?
पोलीस उरले फक्त चौकीत बसून पंचनम्यापुूरते
आंदेकर आणि कोमकर टोळी युद्धात शहरात तब्बल तीन निर्घृण खून झाले आहेत. पहिला खून वनराज आंदेकरचा, दुसरा खून आयुष कोमकरचा तर तिसरा खून नुकताच गणेश काळेचा झाला आहे. बंडू आंदेकर याने आयुष कोमकर खून प्रकरणात कारागृहात जाण्याआधीच प्रतिस्पर्धी टोळीतील सदस्यांच्या कुटुंबीयांची सुपारी देऊन ठेवली आहे.
त्याने तब्बल पाच ते सात जणांची सुपारी दिल्याचे सूत्रांनी सांगितले. यातील दोघांचा लागोपाठ निर्घृण खूनही झाला आहे. यामध्येही अल्पवयीन मुलांचा वापर करण्यात आला आहे. आता उर्वरित टार्गेटवर आहेत. या टोळी युद्धात पोलीस फक्त चौकीत बसून पंचनाम्याचे काम करीत आहेत. तर दुसरीकडे आंदेकर टोळी प्रतिस्पर्ध्यांना पळवू पळवू मारत आहे. यामुळे शहरात खरंच पोलिसांची दहशत राहिली आहे का? असा प्रश्न उपस्थित राहत आहे.





