पुणे – गणेश विसर्जन मिरवणूक सकाळी ७ वाजता सुरू करण्याच्या मागणीला मानाचे पाच मंडळ आणि इतर तीन मंडळांनी जोरदार विरोध दर्शवला आहे. अन्य मंडळांनी लवकर मिरवणूक सुरू करण्याची मागणी केली आहे. यावर पोलीस आयुक्तांनी घेतलेल्या बैठकीत आज काहीही निर्णय झाला नाही. मिरवणुकीच्या वेळेबाबत पोलिस आयुक्त अमितेश कुमार, सह पोलिस आयुक्त रंजनकुमार शर्मा आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सर्व मंडळांची बैठक मंगळवारी घेतली. त्यानंतर मानाचे पाच व इतर तीन मंडळांची वेगळी बैठक झाली. लक्ष्मी रस्ता भागातील मंडळांनी असा आरोप केला की, मानाच्या मंडळांच्या मिरवणुकीस खूप वेळ लागत असल्याने इतर मंडळांना मिरवणूक लवकर सुरू करण्याची परवानगी द्यावी. बैठकीस श्री कसबा गणपती मंडळाचे अध्यक्ष श्रीकांत शेटे, श्री तांबडी जोगेश्वरी मंंडळाचे प्रसाद कुलकर्णी, श्री गुरुजी तालीम मंडळाचे प्रवीणसिंह परदेशी, श्री तुळशीबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे नितीन पंडीत, विकास पवार, केसरी गणेशोत्सव ट्रस्टचे अनिल सपकाळ. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणेशोत्सव ट्रस्टचे सुनील रासने, महेश सूर्यवंशी, अखिल मंडई मंडळाचे अध्यक्ष अण्णा थोरात, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणेशोत्सव ट्रस्टचे उत्सव प्रमुख पुनीत बालन, हुतात्मा बाबू गेन मंढळाचे अध्यक्ष बाळासाहेब मारणे अन्य प्रमुख मंडळांचे पदाधिकारी श्रीकांत शिरोळे, अंकुश काकडे, रविंद्र माळवदकर, संजय बालगुडे, श्रीकांत भिसे, पुष्कर तुळजापूरकर, सुनील कुंजीर, विशाल गुंड, आनंद सगरे यावेळी उपस्थित होते. स्थायी समिती माजी अध्यक्ष श्रीकांत शिरोळे म्हणाले, मानाच्या मंडळांची मिरवणूक सुरू होण्याची प्रतीक्षा करण्याऐवजी इतर मंडळांना मिरवणुकीस परवानगी मिळावी. टिळक रस्ता, लाल बहादूर शास्त्री रस्ता, केळकर रस्ता अशा पर्यायी मार्गांवरून सकाळी ७ वाजता मिरवणूक काढण्याची मुभा मिळावी. ऋषीकेश बालगुडे म्हणाले, लक्ष्मी रस्त्यावरील अनेक मंडळांना लवकर मिरवणूक सुरू करायची आहे. बेलबाग चौकातून मिरवणुकीस परवानगी दिल्यास वेळ वाचेल. पोलिस व इतर यंत्रणां मंडळांमध्ये भेदभाव करत आहेत. विशाल गुंड यांनीही सांगितले की, लहान मंडळांनाही पोलिसांनी सहकार्य केले, तर मिरवणूक लवकर संपले. आम्ही पर्यायी मार्ग स्वीकारण्यास तयार आहोत. पोलिसांवर आठ प्रमुख मंडळांचा दबाव आहे. भाऊसाहेब रंगारी, मंडई मंडळ ठाम श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या मिरवणुकीचा प्रारंभ दुपारी चार वाजता होणार. मानाच्या मंडळांमधील ढोल पथकांची संख्या यंदा कमी होणार आहे. मानाची मंडळे दुपारी दोनच्या सुमारास बेलबाग चौकातून मार्गस्थ होईल. त्यानंतर आम्ही लगेचच मिरवणुकीत सहभागी होऊ. श्रीमंत भाऊसाहेब रंगारी आणि अखिल मंडई मंडळ बेलबाग चौकातून मार्गस्थ झाल्यानंतर दगडूशेठ हलवाई मंडळाच्या मिरवणुकीस दुपारी चारला प्रारंभ होईल. त्यामुळे मिरवणुकीत अडथळा निर्माण होण्याचा प्रश्न उद्भवत नाही, असे पुनीत बालन आणि अण्णा थोरात यांनी नमूद केले. पदाधिकाऱ्यांच्या दोन बैठका झाल्या. त्यात पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेतल्या. मिरवणुकीतील क्रमाबाबत पोलीस कोणताही निर्णय घेणार नाही. जी परंपरा, प्रथा आहे, ती अबाधित राहवी. पोलीसांच्या दृष्टीने सर्व मंडळे सारखीच आहेत. त्यामुळे सर्व मंडळांनी मिरवणुकीबाबत एकत्र निर्णय घ्यावा. त्यानंतर पुन्हा बैठकी घेऊ. – अमितेशकुमार, पोलीस आयुक्त, पुणे.