Pune : जातीयवादी भाजपाला घरी बसवा : खासदार प्रतापगढी

हडपसर – ही निवडणूक केवळ आमदार निवडण्यासाठी नाही, तर जाती-धर्मात तेढ निर्माण करणाऱ्यांविरोधात आहे. द्वेष विरुद्ध प्रेम अशी ही लढाई आहे. त्यांचा नारा बटेंगे तो कटेंगे आहे, तर आपला नारा नफरत की बाजार मी मोहब्बत की दुकान, असा आहे. त्यामुळे महाविकास आघाडीच्या उमेदवारांना मतदान करून जाती-धर्मात फूट पाडणाऱ्या, महाराष्ट्राला लुटणाऱ्या भाजप व महायुतीला घरी बसवा, असा हल्लाबोल काँग्रेसचे खासदार इम्रान प्रतापगढी यांनी केला.
हडपसर मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अधिकृत उमेदवार प्रशांत सुदाम जगताप यांच्या प्रचारार्थ कोंढव्यात आयोजित जाहीर सभेत खासदार इम्रान प्रतापगढी बोलत होते. यावेळी खासदार मोहम्मद फैजल, उमेदवार प्रशांत जगताप, अजमेर शरीफ दर्गा कमिटीचे चेअरमन अमीन पठाण यांच्यासह महाविकास आघाडीतील घटक पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
इम्रान प्रतापगढी म्हणाले की, महाराष्ट्रात भाजपने फोडाफोडी केली, चिन्हे पळवली, पक्ष पळवला.
मात्र, तुम्ही घडी चोरली, तरी वेळ कशी चोरणार? केंद्रातही दोन कुबड्यांवर आधारित सरकार आहे. सर्व जाती-धर्मातील लोकांना सोबत घेऊन जाणाऱ्या प्रशांत जगताप यांना निवडून द्यावे. प्रशांत जगताप यांनी हडपसरच्या विकासासाठी आपली कटिबद्धता व्यक्त केली. हडपसर हे पुण्याचे सांस्कृतिक माहेरघर आहे, परंतु भाजप आणि त्यांचे लोक या सांस्कृतिक वारशाला तडा देण्याचे काम करीत आहेत. जनतेने सावध राहून महाविकास आघाडीला निवडून द्यावे. असे आवाहन केले.





