Pune : उद्योगांच्या समस्या सोडविण्यासाठी समन्वय ठेवा – डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार

पुणे – उद्योग क्षेत्राच्या समस्या सोडविण्यासाठी मुख्यमंत्री गंभीर आहेत. उद्योगांना सर्व पायाभूत सोयीसुविधा पुरवून त्यांच्या समस्या सोडविणे, ही प्रशासनाची जबाबदारी असून, त्यासाठी सर्व संबंधित विभागांनी समन्वयाने काम करावे, असे आदेश विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी दिले.
जिल्ह्यातील विविध औद्योगिक संघटनांसोबत उद्योजकांच्या विविध प्रश्नांच्या सोडवणुकीबाबत विधानभवन येथे आयोजित बैठकीत ते बोलत होते. या वेळी पिंपरी चिंचवड मनपा आयुक्त शेखर सिंह, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, पीएमआरडीएचे अतिरिक्त आयुक्त दीपक सिंगला, पीएमपीएमएलच्या अध्यक्षा दीपा मुधोळ- मुंडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील आदी उपस्थित होते.
डॉ. पुलकुंडवार म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हिंजवडी- माण आयटी पार्क क्षेत्रात पावसाचे पाणी साचणे, वीज खंडित होणे आदी समस्यांच्या अनुषंगाने नुकतीच विधानभवनात बैठक घेऊन उद्योगांची वृद्धी होण्यासाठी कटाक्षाने लक्ष दिले आहे. त्यादृष्टीने सर्व अधिकाऱ्यांनी आपापसांत समन्वयाने गतीने कार्यवाही करावी.
शेखर सिंह म्हणाले, की चिंचवड येथील ईएसआयसी रुग्णालयात अत्याधुनिक उपचार मिळण्यासाठी उपकरणे सेवा सुविधांसाठी केंद्र शासनाकडे पाठपुरावा करू. रुग्णालयाला सीएसआर फंडातून उपकरणे उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील.
जिल्हाधिकारी डुडी म्हणाले, पिंपरी- चिंचवड, चाकण, रांजणगाव, हिंजवडी, तळेगाव, जेजुरी, बारामती आदी सर्वच औद्योगिक क्षेत्रांत, तसेच क्षेत्राबाहेरील उद्योगांसाठी पायाभूत सुविधा पुरविण्यावर भर देण्यात येणार आहे. त्यासाठी सर्व संबंधित विभागांनी उद्योग संघटनांकडून समस्या जाणून घ्याव्यात.
मुधोळ- मुंडे यांनी सांगितले, की कंपन्यांनी आपल्या कामगारांसाठी पीएमपीएमएलच्या बसेसची मागणी केल्यास वेळा आणि मार्ग निश्चित करून बसेस सुरू करण्यात येतील.
विभागीय आयुक्तांचे आदेश
– एमआयडीसीने उद्योगांना वीज, पाणी, रस्ते आदी सुविधा द्याव्या
– रस्त्यांवरील खड्डे संबंधित यंत्रणांनी भरून घ्यावेत
– क्षेत्रातील व क्षेत्राबाहेरील भागात कचरा, गटरांची स्वच्छता करावी
– महावितरणने फीडर, उपकेंद्रे, वीजवाहिन्या अद्ययावत कराव्यात
– वीजपुरवठ्यातील चढ- उताराचा डाटा घेऊन त्याचे विश्लेषण करावे
– रस्त्यांवरील अतिक्रमणे काढावीत





