Rupali Thombare : रवींद्र धंगेकर शिंदे गटात जाताच रुपाली ठोंबरेंची ‘ती’ पोस्ट चर्चेत; थेट म्हणाल्या….

Ravindra Dhangekar | Rupali Thombare : काँग्रेसचे माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी काँग्रेसला सोडचिट्ठी दिली आहे. त्यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेत पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याचे घोषित केले आहे. रवींद्र धंगेकरांनी काँग्रेस सोडल्यामुळे पुण्यात काँग्रेसचं मोठं नुकसान झालं आहे.
२०१९ च्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या आधी राज्यात काँग्रेसला मोठी गळती लागली होती. त्या काळात पक्षातील अनेक मोठे नेते पक्ष सोडून भाजपा व शिवसेनेत गेले होते. मात्र, रवींद्र धंगेकरांनी पुणे जिल्ह्यात काँग्रेसचे अस्तित्व टिकवून ठेवले होते. आता मात्र पुण्यात काँग्रेसकडे मोठं नेतृत्व राहिलेलं दिसत नाही.
काँग्रेसला सोडचिट्ठी दिल्यानंतर रवींद्र धंगेकर यांनी सोमवारी (दि. १० मार्च) शिवसेना (शिंदे) पक्षात प्रवेश केला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्यांच्या पक्ष प्रवेशावर आता राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)च्या प्रदेश प्रवक्त्या रुपाली ठोंबरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे.
रुपाली ठोंबरे म्हणाल्या, ‘रवी भाऊ तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विचार केला नाही त्याचे दुःख झाले पण असो तो तुमचा अधिकार, स्वातंत्र आहे कोणत्या पक्षात जायचे ते. आमच्या महायुतीच्या मित्र पक्षात शिवसेनेत, शिंदे साहेब यांच्या पक्षात प्रवेश घेतला त्याबद्दल अभिनंदन रवी भाऊ. राजकारणातील पक्षाचे विचार वेगळे असतात मनभेद कधीच नसतात. अभिनंदन ,भाऊ तुझ्या पुढील कार्यास शुभेच्छा.” असं त्यांनी लिहलं आहे.
रविंद्र धंगेकर यांची राजकीय कारकीर्द
रविंद्र धंगेकर यांनी आपल्या राजकीय कारकीर्दीची सुरूवात शिवसेनेतून केली. १९९७ ते २००६ या काळात ते शिवसेनेत होते. २००६ ते २०१७ या ११ वर्षाच्या काळात ते मनसे मध्ये होते. २०१७ ला ते पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये नगरसेवक म्हणून निवडून आले.
त्यांना या निवडणुकीत काँग्रेसने मदत केली होती. त्यानंतर त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. २०२३ मध्ये कसबा या भाजपच्या बालेकिल्ल्यात पोटनिवडणुकीत विजय मिळवला. २०२४ ला काँग्रेस पक्षाने त्यांना पुणे लोकसभा मतदारसंघांची उमेदवारी दिली होती मात्र त्यांचा मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी पराभव केला होता.
शिवसेनेत जाण्यामागचं नेमकं कारण काय?
मी पक्षाला कधी दोष दिला नाही आणि देणार नाही. मी ज्या भागात वर्षानुवर्षे काम करत आहे, तेथील लोकांशी बोललो. मग लक्षात आलं की, तुम्हाला काम करावचं लागेल, पण सत्तेशिवाय काम होत नाही. तसेच एकनाथ शिंदे साहेब आणि उदय सामंत यांनी मला अनेकदा फोन केले. धंगेकर आमच्याकडे या, अशी ऑफर दिली. आमच्यात मित्रत्त्वाचं नातं असल्याने एकत्र काम करण्याचे ठरवले, असे धंगेकर म्हणाले.





