Pune : नियमांचा भार, तरीही जड वाहने बेदरकार!

पुणे – जड वाहनांमुळे होणारे अपघात लक्षात घेऊन पुणे पोलिसांच्या वाहतूक शाखेने कठोर नियमावली कागदावरच तयार केली आहे. त्यामुळे जड वाहने शहरात घुसखोरी करतात. काही ठिकाणी पोलिसांच्याच आशीर्वादाने ही वाहने शहरात येत आहेत.
तर, दुसऱ्या बाजूला नियम मोडल्याप्रकरणी मागील अडीच महिन्यांत सुमारे लाखभर वाहनांवर वाहतूक पोलिसांनी कारवाई केली आहे. त्यामध्ये ३२ हजार जड वाहनांचा समावेश असल्याचे सांगितले जात आहे. पण, कारवाई होत असताना जड वाहने शहरात येतातच कशी? आणि अपघात होतातच कसे? असे प्रश्न निर्माण झाले आहेत.
वाहतूक कोंडी आणि अपघातास जड वाहने कारणीभूत असल्याचे लक्षात घेऊन वाहतूक पोलिसांनी जड वाहनांना शहरात येण्यासाठी ठराविक वेळ नेमून दिली आहे. यामध्ये सकाळी ८ ते १२ आणि दुपारी चार ते रात्री नऊ वाजेपर्यंत जड आणि अवजड वाहनांना शहरात येण्यास बंदी आहे.
मात्र, शहरात मोठ्या प्रमाणात मेट्रो, महापालिका आणि अन्य बांधकामे सुरू आहेत. यामुळे मेट्रो आणि इतर शासकीय कामासाठी जड वाहने परवानगी घेऊन शहरात येतात. तर, व्यावसायिकांची वाहने सर्रास नियमांचे उल्लंघन करुन शहरात दाखल होतात. टँकरचालक तर कोणतेच नियम पाळत नाही.
शहरातील काही उपनगरांत दिवसभर टँकर सुरू असलेले दिसतात. धायरी, सिंहगड रस्ता परिसरात तर गौण खनिज उत्खनन करून त्याची वाहतूक करणारे ‘हायवा’ ट्रक आणि डंपर अक्षरश: २४ तास सुरू असतात. त्यामुळे पादचारी आणि अन्य वाहनचालक जीव मुठीत धरूनच प्रवास करतात. लोकवस्ती असलेल्या या भागाकडे पोलिसांचे मात्र जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याचा आरोप स्थानिक नागरिक करत आहेत.
वाघोली- लोणीकंद परिसरात वर्षभरात ५४ जीवघेणे अपघातात, तब्बल ८५ मृत्यू
वाघोली-लोणीकंद परिसरात २०२४ मध्ये ५४ जीवघेणे अपघात झाले आहेत. यामध्ये १२ अपघात हे डंपर चालकांमुळे झाले. या अपघातांत एकूण ८५ जणांचा मृत्यू झाल्याची पोलिसांचीच आकडेवारी आहे. या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात जड वाहतूक होते. रांजणगाव एमआयडीसीमुळे जड वाहनांचे प्रमाण मोठे आहेत.
यातच येथे मोठ्या प्रमाणात बांधकाम व्यावसायिकांचे प्रकल्प सुरू आहेत. यामुळे सिमेंट, खडी आणि इतर साहित्यांची वाहतूक करणाऱ्या जड वाहनांची वर्दळ दिवसभर सुरू असते. पण, अपघातांत बळी जाऊनही पोलिसांनी कोणतीही ठोस नियमावली लागू केलेली नाही, ही परिस्थिती वारंवार समोर येते.
चालकाने डंपरमध्येच केले मद्यपान
अपघातग्रस्त डंपरच्या चालकाने डंपरमध्येच मद्यपान केले होते. त्याने दोन दिवसांपूर्वीच मद्याची बाटली विकत घेतली होती. बहुतांश जड वाहनांचे चालक मद्य विकत घेतल्यावर ते वाहनातच पिणे पसंत करतात. लांबचा प्रवास असेल तर ते एखाद्या ढाब्यावर किंवा रस्त्याकडेला वाहन उभे करुन मद्यपान करतात. पोलिसांना डंपरमध्ये मद्याची बाटली सापडली आहे. चालकाचा वैद्यकीय अहवाल येणे बाकी आहे. मात्र, त्याने मद्यप्राशन केल्याची कबुली दिली आहे.





