Pune : वकिलांनी सामाजिक, नैतिक भान ठेवणे गरजेचे; न्यायमूर्ती मिलिंद जाधव यांचे प्रतिपादन

पुणे – वकिली व्यवसायातून पैसे कमविणे गैर नाही. मात्र, वकिलांनी सामाजिक अन् नैतिक भान ठेवणे खूप गरजेचे आहे. उत्तम वकील होण्यासाठी स्वाभिमान, चिकाटी अन् सहनशक्ती, प्रभावी व्यक्तिमत्त्व, वक्तशीरपणा, विनम्रता आदी गुणांची गरज आहे. कायद्यावरील विश्वास आणि अभ्यासातून प्राप्त झालेला आत्मविश्वास हा यशस्वी वकिली व्यवसायाचा मूलमंत्र असल्याचे प्रतिपादन मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती मिलिंद जाधव यांनी केले.
शिवाजीनगर न्यायालय ‘पाठ्यपुस्तकापलीकडील गुन्हेगारी कायद्याचे अनुभव आणि कायदेविषयक साहाय्य’ या विषयावरील मासिक प्रशिक्षणाच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते. या वेळी प्रमुख पुणे जिल्हा न्यायाधीश महेंद्र महाजन, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सचिव सोनल पाटील, दर्द से हमदर्द तक ट्रस्टचे सचिव अॅड. प्रकाश साळशिंगीकर, ज्येष्ठ विधिज्ञ सतिश गोरडे आदी उपस्थित होते.
महेंद्र महाजन यांनी, पाठ्यपुस्तकातील ज्ञानाबरोबरच असे उपक्रम महत्त्वाचे असल्याचे सांगितले. सोनल पाटील यांनी प्रशिक्षित वकील आपली कायदेविषयक लढाई सक्षमपणे लढतील असा विश्वास व्यक्त केला. ॲड. प्रकाश साळशिंगीकर यांनी प्रास्ताविकात ‘दर्द से हमदर्द तक ट्रस्टच्या कार्याची सुरुवात मुंबईपासून झाली असून राज्यभर दिग्गज विधिज्ञांची व्याख्याने, गरीब अन् गरजूंना कायदेविषयक साहाय्य करण्यात येत असल्याचे सांगितले.
ट्रस्टच्या कार्यकारी अधिकारी सुनीता साळशिंगीकर, सचिन शिंदे, खेताराम सोळंकी, संकेत राव, सोहम यादव, महेश सोनवणे, हिमांशू माने आदी वकील सहकाऱ्यांनी संयोजनाचे परिश्रम घेतले. ॲड. गणेश नागरगोजे यांनी सूत्रसंचालन केले. ॲड. सतिश गोरडे यांनी आभार मानले.





