बेशिस्त वाहनचालकांमुळे मोशीकर हैराण

मोशी, (वार्ताहर) – पुणे-नाशिक मार्गावरील मोशी परिसरात वाहतूक नियंत्रण करणारे पोलीस चौकात नसल्याने वाहतुकीच्या नियमांचे वाहनचालक पालन करत नाहीत. त्यामुळे मोशी परिसरात सातत्याने वाहतूक कोंडी होत आहे. बेशिस्त वाहनचालकांमुळे पादचाऱ्यांना जीवमुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. बेशिस्त वाहनचालकांना लगाम घालण्यासाठी वाहतूक विभागाने येथे कायमस्वरुपी वाहतूक नियंत्रक पोलिसाची नियुक्ती करावी, अशी मागणी होत आहे.
मोशी-आळंदी मार्ग आणि मोशी मार्केट चौकात वाहतुकीचे नियंत्रण होण्यासाठी सिग्नल यंत्रणा आहे. ही यंत्रणा सुरूदेखील आहे. परंतु पुणे-नाशिक मार्गावर प्रवास करणारे वाहनचालक या सिग्नलचे पालन करत नसल्याने चौकांमध्ये वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत आहे. बर्याच वेळा वाहतुकीचे नियम न पाळल्याने लहान मोठे अपघात घडत आहेत. त्यामुळे येथे वाहतूक नियंत्रक पोलीस कर्मचारी नेमण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी भोसरी वाहतूक पोलीस विभागाकडे केली आहे.
बेशिस्त वाहनचालक नियमांचे पालन करत नसल्याने उपबाजार समितीत येणारे ग्राहक, शालेय विद्यार्थ्यांसह ज्येष्ठ नागरिक, महिला वर्ग व स्थानिक नागरिकांना रस्ता ओलांडणे अवघड झाले आहे. पेट्रोल पंपाकडून येणार्या वाहनांना मोशी आणि जाधववाडी रस्त्याकडे जाण्यासाठी वाहतूक नियंत्रक दिवे नाहीत.
त्यामुळे, वाहतूक पोलीस नेमून नियमांचे उल्लंघन करणार्यांवर कडक कारवाई करण्यात यावी. तसेच मोशीतील मुख्य चौकात देखील हीच परिस्थिती आहे. या चौकात दोन्ही बाजूला प्राथमिक शाळा आहेत. हा चौक नेहमीच गजबजलेला असतो. त्यामुळे, मोशीतील या दोन्ही चौकांत वाहतूक पोलीस नेमण्यात यावेत, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.





