प्रभात वृत्तसेवा पिंपरी – शालेय विद्यार्थ्यांची जीव धोक्यात घालून वाहतूक करणाऱ्या वाहनचालकांविरुद्ध प्रादेशिक परिवहन कार्यालय आणि पिंपरी चिंचवड वाहतूक पोलिसांनी संयुक्त कारवाई केली. या कारवाईतून धक्कादायक माहिती समोर आली आहे. प्रशासनाने केलेल्या वाहन तपासणीमध्ये १५७ स्कूल व्हॅन आणि रिक्षांची तपासणी करण्यात आली. यामध्ये तब्बल ८१.५२ टक्के म्हणजे १२८ वाहने दोषी आढळली आहे. आरटीओ आणि वाहतूक पोलिसांनी या वाहनांवर दंडात्मक कारवाई केली आहे. मात्र दंडात्मक कारवाईने मुलांच्या डोक्यावरील अपघाताचा धोका टळणार का, असा सवाल नागरिक विचारत आहे.स्कूल व्हॅन आणि रिक्षाच्या तुलनेत शाळेकडून सुरू करण्यात आलेल्या स्कूल बसच्या दरांमध्ये मोठी तफावत आहे. त्यामुळे पालकच मुलांच्या सरक्षेशी तडतोड करीत मुलांना व्हॅन किंवा रिक्षातून शाळेत पाठवितात. या वाहनांमध्ये मुलांना अक्षरशः जनावरांप्रमाणे कोंडून भरलेले असतात. गेल्या आठवड्यात एक स्कूल व्हॅन चालक धोकादायक पद्धतीने वाहन चालवत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. याबाबत एका महिलेने चालकाला जाब विचारला असता त्याने नागरिकांना उद्धट उत्तर देत माझा फोटो काढा, असे सांगितले.शालेय विद्यार्थ्यांची होणारी धोकदायक वाहतूक लक्षात घेऊन प्रादेशिक परिवहन कार्यालय आणि वाहतूक पोलीस यांनी एकाच दिवशी शहरातील विविध शाळांसमोर, तसेच मुख्य रस्त्यांवर सकाळी आणि दुपारी घेतलेल्या तपासणी मोहीम घेतली. विद्यार्थ्यांच्या क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी घेणे, बस-व्हॅनमध्ये आवश्यक सुरक्षेची साधने नसणे, वाहनचालकांकडे परवाना किंवा आवश्यक कागदपत्रे नसणे अशा प्रकारच्या गंभीर नियमभंगांचे मोठ्या प्रमाणावर प्रमाण आढळून आले.प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे की शाळा सुरू असताना विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी ही कारवाई अधिक कडक केली जाणार असून नियमभंग करणाऱ्यांविरुद्ध पुढेही कठोर भूमिका घेतली जाईल. तपासणी केलेल्या स्कूल बस – १७७ कारवाई केलेल्या बसेसची संख्या – ७७ तपासणी केलेल्या व्हॅन/रिक्षाची संख्या – १५७ कारवाई केलेल्या व्हॅन/रिक्षाची संख्या – १२८ कारवाईत केलेला एकूण दंड – ७,६९,७५०