Pune : जमीन व्यवस्थापनाचे यशदा येथे प्रशिक्षण

पुणे : जमीन हा विषय अनेकांच्या निगडीत असतो. मात्र त्याबद्दल अधिकृत माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध होत नाही. केंद्र व राज्य शासनाच्या अनेक विभांगासुद्धा ही समस्या येते. यापार्श्वभूमीवर यशदा येथे प्रथमच शासकीय अधिकारी व खासगी व्यक्ती यांच्यासाठी जमीन व्यवस्थापनाशी संबधित प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते.
यामध्ये जमिनींचे अभिलेख, जमीन मोजणी, रिमोट सेंसिंग तंत्रज्ञान, जमिनीचे अभिलेख डिजिटल स्वरूपात जतन करण्याचे प्रकल्प, नोंदणी प्रक्रिया व स्टॅम्प ड्युटीबाबत तरतुदी, जमिनीशी संबंधित विविध समस्या, तसेच वाद सोडविण्याचे विविध संस्थात्मक मार्ग यांबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
राज्य शासनाच्या ‘यशदा’ या सर्वोच्च प्रशिक्षण संस्थेमध्ये ‘जमीन व्यवस्थापन उत्कृष्टता केंद्र’ गत वर्षी स्थापन करण्यात आले आहे. प्रथमतःच आयोजित केलेल्या या प्रशिक्षण वर्गास खासगी क्षेत्रातील कंपन्यांचे विशेषतः रियल इस्टेट कंपन्यांचे प्रतिनिधी, केंद्र सरकारच्या माझगाव डॉक शिपयार्ड लिमिटेड, भारत कोकिंग कोल लिमिटेड, हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड, शासनाच्या सार्वजनिक उपक्रमांचे प्रतिनिधी, शासनाचे अधिकारी व कर्मचारी, विधी व्यावसायिक, व्हॅल्यूयर्स व विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला.




