Pune : निधीची कमतरता भासू देणार नाही – उपमुख्यमंत्री अजित पवार

पुणे – पेरणे फाटा येथे १ जानेवारी २०२५ रोजी आयोजित विजयस्तंभ अभिवादन सोहळ्यासाठी येणाऱ्या अनुयायींची गैरसोय टाळण्याच्या दृष्टीने आवश्यक त्या सोयीसुविधा उपलब्ध करून घ्याव्यात. सोहळा शांततेत आणि उत्साहात साजरा व्हावा, यासाठी सर्व संबंधित विभागांनी उत्तम नियोजन करावे. शासनाकडून निधीची कमतरता पडू देणार नाही, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.
विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रमाच्या पूर्वतयारीबाबत आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीपूर्वी पवार यांनी विजयस्तंभास पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले. या वेळी आमदार ज्ञानेश्वर कटके, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील, बार्टीचे महासंचालक सुनील वारे, पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता अतुल चव्हाण, अधीक्षक अभियंता बप्पा बहीर आदी उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, येत्या १ जानेवारी रोजी विजयस्तंभ अभिवादन सोहळ्यासाठी येणाऱ्या अनुयायांची संख्या लक्षात घेता, त्यादृष्टीने सर्व बाबींचे सूक्ष्म नियोजन करावे. परिसरात वाहतूक कोंडी होणार नाही, यासाठी वाहतूक व्यवस्था, वाहनतळाचा आराखडा तयार करावा, स्वच्छतेसाठी पथकांची नियुक्ती आणि स्वच्छतागृहांसाठी पुरेशा प्रमाणात पाण्याची सुविधा करावी, तसेच पिण्याच्या पाण्यासाठी टँकरची संख्याही विचारात घ्यावी.
पोलीस विभागाने वाहतुकीचे नियोजन करून कायदा व सुव्यवस्थेबाबत नियोजन करावे. पीएमपीएमएलने पुरेशा बसेसची व्यवस्था करावी. सार्वजनिक बांधकाम विभाग आणि जिल्हा परिषद बांधकाम विभागाने रस्त्यांची डागडुजी करून घ्यावी. ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग नागरिकांही सुलभरीत्या विजयस्तंभास अभिवादन करता येईल, याबाबत दक्षता घ्यावी. रुग्णवाहिका, प्रथमोपचार पेटी पुरेशा प्रमाणात ठेवाव्यात. एकंदरीत अभिवादन सोहळा यशस्वी करण्यासाठी सर्व संबंधित विभागाने समन्वयाने कामे करावीत, अशा सूचना उपमुख्यमंत्री पवार यांनी दिल्या.





