Pune: ‘कात्रज’ शेतकऱ्यांना दोन रुपये दर फरक देणार

कात्रज – पुणे जिल्हा दूध उत्पादक संघ, कात्रज डेअरीने दूध उत्पादक शेतकऱ्यांना दोन रुपये दर फरक देण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी १३ ते १४ कोटी रुपये लागणार आहेत. संघाची ६५वी वार्षिक सर्वसाधारण सभा अध्यक्ष भगवान पासलकर यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी (ता. २७) झाली. त्यामध्ये हा निर्णय घेण्यात आला.
या आर्थिक वर्षात संघाला तीन कोटी एक लाख ५७ हजार रुपयांचा निव्वळ नफा झाला आहे. मागील वर्षी संघाची तरतूद नसताना दूध फरकापोटी एक रुपया दर फरक देण्यात आला होता. त्यानुसार संघाने २०२३-२४ मधील दुधावर एक रुपया प्रतिलिटर दर फरक देण्याची तरतूद केली होती.
मात्र, संस्था प्रतिनिधी आणि दूध उत्पादक शेतकऱ्यांनी असमाधान व्यक्त करत तीन रुपये दर फरक देण्याची मागणी केली होती. त्यावर अध्यक्ष आणि संचालक मंडळाच्या मान्यतेने दोन रुपये फरक देण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला.
सभेमध्ये उत्कृष्टपणे कामकाज करणाऱ्या १६ आदर्श दूध संस्थांची निवड करण्यात आली. त्यांना प्रशस्तिपत्र,सन्मान चिन्ह व स्वच्छ दूध उत्पादनास प्रोत्साहन तसेच पशुखाद्याची सर्वांत जास्त विक्री करणाऱ्या ११ दूध संस्थांची निवड करण्यात आली होती. त्यांना पुरस्कार, स्मृतीचिन्ह व पशुखाद्य विक्री वाढविण्यासाठी प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने ११ हजार रुपये देऊन गौरविण्यात आले. व्यवस्थापकीय संचालक मनोज लिमये यांनी स्वागत केले. भाऊ देवाडे यांनी आभार मानले.
“संघ सातत्याने दूध उत्पादकांच्या हिताचे निर्णय घेत आहे. उत्पादकांना जास्तीत जास्त दूध खरेदी दर देण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील आहे. दूध उत्पादक शेतकऱ्यांनीही संघाचां ही विचार करणे गरजेचे आहे.”- भगवान पासलकर, अध्यक्ष, पुणे जिल्हा दूध संघ.





