Pune : कात्रज तलावातील गाळ काढणार; महापालिकेने केला तलाव रिकामा

पुणे – महापालिकेच्या कात्रज येथील स्वर्गीय राजीव गांधी प्राणी संग्रहालयाच्या परिसरात असलेल्या तलावातील सर्व पाणी सोडण्यात आले आहे. महापालिकेकडून शहरीपूर व्यवस्थापन प्रणाली अंतर्गत या तलावाची खोली वाढविण्यात येणार असून त्यासाठी या तलावातील गाळ काढला जाणार आहे. हे काम पाटबंधारे विभागाच्या मदतीने केले जाणार असल्याची माहिती महापालिकेच्या पर्यावरण विभागाचे प्रमुख मंगेश दिघे यांनी दिली.
या तलावातून सोडण्यात आलेले पाणी आंबील ओढ्याच्या माध्यमातून मुठा नदीस मिळते. २०१९ मध्ये हा तलावपूर्ण भरला होता, त्यानंतर त्यातून मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यात आले होते. त्यामुळे आंबील ओढ्याला पूरस्थिती उद्भवली होती. या शिवाय, या तलावात मोठ्या प्रमाणात आसपासचे सांडपाणी येत असल्याने या तलावात जलपर्णी मोठ्या प्रमाणात फोफावत असून त्याचा फटका या भागातील जैव विविधतेला बसत आहे.
त्यामुळे तलावात येणारे सांडपाणी बंद करून या ठिकाणी महापालिकेकडून दोन एमएलडी क्षमतेचा सांडपाणी प्रकल्प उभारण्यात येत आहे. त्यासोबतच आता गाळही काढला जाणार आहे. त्यामुळे तलावाची पावसाळ्यातील पाणी साठवण क्षमता वाढण्यास मदत होणार आहे. तसेच, सांडपाणीही बंद होणार असल्याने तलावाला पुन्हा गतवैभव मिळणार आहे.





