Pune News : भाच्याच्या सासऱ्याचा खून करून पोलिस ठाण्यात झाला हजर; डोक्यात दगड घालून खून
Pune News : भाच्याच्या सासऱ्याच्या डोक्यात मोठा दगड घालून निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना पुण्यातील महंमदवाडी परिसरात उघडकीस आली आहे.

Pune News : भाच्याच्या विस्कटलेल्या संसाराच्या रागातून एकाने भाच्याच्या सासऱ्याच्या डोक्यात मोठा दगड घालून निर्घृण खून केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. महंमदवाडी येथील लक्ष्मी पार्कजवळील डोंगरावर रविवारी (दि. ९) रात्री १०:३० च्या सुमारास ही घटना घडली. (Pune News)
विशेष म्हणजे, खून केल्यानंतर रक्ताने माखलेला आरोपी स्वतःहून चालत काळेपडळ पोलीस ठाण्यात हजर झाला आणि त्याने गुन्ह्याची कबुली दिली. सैफन बाबूलाल सय्यद ( ४३, रा. राजीव गांधी कॉलनी, तरवडे वस्ती, हडपसर, पुणे) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. (Pune News)
याप्रकरणी काळेपडळ पोलीस ठाण्याच्या महिला पोलीस अंमलदार विजया जयदीप चव्हाण (३७) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी हनुमंत उर्फ सागर सुग्रीव कांबळे (२५, रा. आशीर्वाद पार्क, महंमदवाडी, पुणे) याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम १०३(१) अन्वये खुनाचा गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे. (Pune News)
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत सैफन सय्यद यांची मुलगी सना हिचा विवाह आरोपी हनुमंत कांबळे याचा भाचा लखन काळोखे याच्याशी झाला होता. मात्र, आरोपीच्या भाच्याचा काही दिवसांपूर्वी मृत्यू झाला आहे. पतीच्या निधनानंतर सना सासरी व्यवस्थित नांदत नव्हती. (Pune News)
रविवारी सासरच्या मंडळींशी झालेल्या वादानंतर सना ही रागाच्या भरात जंगलाच्या दिशेने निघून गेली होती. मुलीचा शोध घेण्यासाठी तिचे वडील सैफन सय्यद आणि आरोपी हनुमंत कांबळे हे दोघेही महंमदवाडी येथील लक्ष्मी पार्कजवळील डोंगराकडे गेले. (Pune News)
तेथे सिमेंटच्या टाकीजवळ दोघांमध्ये सना सासरी राहत नसल्याच्या कारणावरून वाद पेटला. या वादाचे रूपांतर हिंसेत झाले अन् संतापलेल्या कांबळे याने तेथे पडलेला मोठा दगड सैफन यांच्या डोक्यात मारून त्यांना जागीच ठार केले. (Pune News)
घटनेनंतर रविवारी रात्री ११:३५ च्या सुमारास आरोपी कांबळे हा स्वतः रडत आणि आरडाओरडा करत काळेपडळ पोलीस ठाण्यात आला. त्याच्या गळ्याला दुखापत झाली होती अन् अंगावरील कपड्यांवर रक्ताचे डाग होते. (Pune News)
कर्तव्यावर असलेल्या महिला अंमलदार विजया चव्हाण यांनी विचारपूस केली असता, त्याने “मी सैफन सय्यदचा खून केला आहे,” असे सांगितले. त्यानंतर रात्रपाळीवरील सहाय्यक पोलीस निरीक्षक अमित शेठे व पथकाने घटनास्थळी धाव घेतली असता सैफन यांचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात आढळून आला. या गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रविण अब्दागिरे करत आहेत. (Pune News)
Pune News : केसांचा टोप घालून घरफोड्या करणारी आंतरराज्यीय टोळी जेरबंद; ३७ लाखांचा ऐवज जप्त





