PUNE : ‘वॉर्ड क्रमांक 16’ मध्येच काळेबेरे! ससून रुग्णालयातून सुरू होता अमली पदार्थाचा व्यवहार

पुणे – ससूनमध्ये उपचार घेणाऱ्या कैद्याने रुग्णालयात बसून हस्तकांकरवी अमली पदार्थ तस्करी सुरू ठेवल्याचे रविवारी समोर आले. पोलिसांनी या कारवाईत सुमारे सव्वादोन कोटी रुपयांचा “मेफेड्रोन’ जप्त केला. याप्रकरणी पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी “वॉर्ड क्रमांक 16’बाहेर बंदोबस्तावरील पोलीस कर्मचाऱ्यांच्या चौकशीची जबाबदारी एका महिला सहायक पोलीस आयुक्तांकडे सोपवली आहे.
यातील मुख्य आरोपी ललित पाटील हा अडीच वर्षांपासून येरवडा कारागृहात होता. पण, वेगवेगळी वैद्यकीय कारणे सांगत त्याने आतापर्यंत निम्मा कालावधी ससून रुग्णालयात घालवला. 2020 मध्ये अटकेच्या तिसऱ्याच दिवशीच त्याने जिन्यातून पडल्याचे नाटक करत रुग्णालयाचा रस्ता धरला. त्यानंतर जून-2023 पासून तो ससूनमध्ये दाखल होता.
ससून रुग्णालय प्रशासनाची भूमिका संशयास्पद
ललित पाटीलने “वॉर्ड क्रमांक 16’मध्ये अंमली पदार्थ मागवून घेतले. तेथूनच वेटरमार्फत ते साथीदारास देण्यास सांगितले. साथीदार कोठे थांबला आहे, हे देखील वॉर्डच्या खिडकीतून वेटरला दाखवले होते. वॉर्ड 16 बाहेर दोन पातळीवर पोलिसांचा पहारा असतो. मुख्यालयातील पोलिसांबरोबरच कारागृहाचाही कर्मचारी बंदोबस्तावर असतो. येथे 16 सीसीटीव्ही आहेत. पण, सर्वच्या सर्व बंद असल्याचे या घटनेनंतर समोर आले. यामुळे येथे उपचार घेणाऱ्या कैद्यांचे फुटेज पोलिसांना मिळालेले नाही.
दरम्यान, इतके सर्व घडल्यानंतर ससून प्रशासनाने सोमवारी तातडीने सीसीटीव्ही दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे. यामुळे ससून प्रशासनाची भूमिकाही संशयास्पद आहे. दरम्यान, ससूनचे डीन संजीव ठाकूर यांच्याशी मोबाइलवर संपर्क साधला असता, त्यांनी प्रतिसाद दिला नाही.
कोण आहे ललित पाटील…
ललित पाटील हा मूळचा नाशिक येथील असून, दहावीपर्यंत त्याचे शिक्षण झालेले आहे. मात्र, त्यानंतर ड्रग्ज व्यवसायात तो शिरला. वरवर तो आयात-निर्यात व्यावसायिक असल्याचे भासवत होता. प्रत्यक्षात अमली पदार्थ उत्पादक, विक्रेते, दलाल यांच्यात मध्यस्थी करुन त्यांना कायदेशीर मदत पोहचवणे, तस्करी प्रकणातील केसेस सांभाळणे, त्यांना कारवाईतून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करणे अशी कामे तो करत होता.
याबदल्यात ड्रग्ज घेऊन ते उच्चभ्रू लोकांना विकून बक्कळ पैसा कमवत आहे. यात त्याला एक महिला वकील मदत करत होती. त्याच्याकडे सापडलेल्या दोन मोबाइल फोनमध्ये एक भावाचे आणि एक महिला वकिलाच्या नावाचे सिमकार्ड आढळले आहे. दोन्ही फोनचे स्क्रीन लॉक असून तो पासवर्ड देण्यास टाळाटाळ करत असल्याने तांत्रिक तपास थांबला आहे.





