पुणे – राज्यातील शेतकऱ्यांच्या प्रश्नाबाबत राज्य सरकार सकारात्मक आहे. शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीचा निर्णय घेतला, तर बँकांच्या खात्यात पैसे जमा होतील. त्यामुळे नुकसानीसाठी आधी शेतकऱ्यांना आर्थिक मदत दिली जात असून, त्यांच्या खात्यावर पैसे जमा होत आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. यशदा येथील कार्यक्रमानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधला. या वेळी माजी आमदार बच्चू कडू यांनी कर्जमाफीच्या मुद्द्यावर नागपूर येथे रस्ता रोको आंदोलन सुरू केल्याबाबत विचारले असता मुख्यमंत्र्यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले, की महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे बच्चू कडू यांच्याशी चर्चा करत आहेत. मात्र, आंदोलनाच्या माध्यमातून प्रश्न सुटणार नाही. त्यासाठी एक कृती आराखडा तयार करावा लागेल. आम्ही चर्चेस तयार आहोत. आंदोलनामुळे लोकांना त्रास होईल, असे बच्चू कडू यांनी वागू नये, असे आवाहनही त्यांनी केले.